तलाठी कार्यालय ‘खाजगी इसम’कडे ; जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशांचे उघड उघड उल्लंघन…
उरुळी कांचन येथील महसूल विभागाचा धक्कादायक भोंगळ कारभार!...

उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन येथील तलाठी कार्यालयाचा कारभार खाजगी व्यक्तीकडून सर्रासपणे चालवला जात असल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी (दि.१४) प्रत्यक्ष पाहण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास समोर आलेल्या या प्रकारामुळे हवेली महसूल विभागातील शासकीय कागदपत्रांची सुरक्षितता, गोपनीयता आणि विश्वसनीयता धोक्यात आली आहे.
कार्यालय रिकामे – शासकीय कर्मचारी गायब…
शुक्रवारी कामकाजाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता जवळपास ३० मिनिटे कार्यालयात एकही शासकीय कर्मचारी उपस्थित नव्हता. ना तलाठी, ना कोतवाल, ना मंडल अधिकारी… परंतु कार्यालय ‘उघडे’ होते, दप्तरें उघडी पडली होती, फाईली टेबलावर होत्या.
अचानक काही वेळाने कानिफनाथ पवार नावाचा एक खाजगी इसम कार्यालयात आला आणि सरळ तलाठीच्या खुर्चीवर बसून दप्तर हाताळू लागला. शेतकऱ्यांची फाईली, दखलपात्रे, कागदपत्रे, अर्ज… सर्व काही तो बिनधास्त तपासत असल्याचे दृश्य प्रत्यक्ष पाहण्यात आले. याचा व्हिडिओही समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशांची पायमल्ली…
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी यशवंत माने आणि हवेली तहसीलदार यांनी “तलाठी आणि मंडल कार्यालयात कोणताही खाजगी इसम कामकाजासाठी ठेवू नये” असा स्पष्ट लेखी आदेश जारी केला आहे. पण उरुळी कांचन तलाठी कार्यालयात मात्र या आदेशांची सरळ पायमल्ली होताना दिसत आहे. शासकीय दप्तर, महसूल नोंदी आणि संवेदनशील कागदपत्रे एका खाजगी माणसाकडे सोपवली जात आहेत. यापुढे हे दस्तऐवज दुरुपयोगासाठी वापरले गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा गंभीर प्रश्न “आ” करून उभा आहे.
लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातीलही प्रकार?
सूत्रांनुसार, याच खाजगी व्यक्तीकडून लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील नोंदींवर सह्या घेण्याचे, दप्तर उचलण्याचे कामही केले जाते. यामुळे महसूल विभागातील नियमबाह्य आणि अनियमित कार्यपद्धती किती खोलवर आहे, याचा अंदाज येतो.
तलाठी ‘वसूली’त व्यस्त? – प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ…
तलाठी प्रियंका सुंदर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “वसूलीचे काम सुरू आहे” असे सांगितले. कागदपत्रे खाजगी व्यक्ती हाताळत असल्याबाबत विचारले असता त्या प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती —
“तलाठी आणि कोतवाल वसूलीच्या कामात गुंतल्याने कार्यालय शेतकऱ्यांवर आणि खाजगी व्यक्तींवर सोपवले गेले आहे.”
शासकीय कार्यालयात ‘खाजगी व्यक्ती’चा उघड वापर – नागरिक संतप्त…
हवेली तालुक्यात अनेक तलाठी कार्यालयांमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची मूळ कागदपत्रे, सातबारा, फेरफार अर्ज, दाखले, नोंदी— ही सर्व अत्यंत संवेदनशील माहिती खाजगी हातात गेल्यावर तिचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते.
नागरिकांचा प्रश्न सरळ आहे—“महसूल खाते राम भरोसे चालतेय का? शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची जबाबदारी कोणाची?”
आवक-जावक विभागाची सफाई…
या प्रकरणात मयूर शेवाळे (आवक-जावक विभाग, लोणी काळभोर) यांनी सांगितले—
“कानिफनाथ पवार हा शासकीय कर्मचारी नाही. मात्र तलाठी प्रियंका सुंदर्डे यांच्या संमतीनेच त्याच्याकडे दप्तर दिले. नियमाप्रमाणे त्याची सही घेतली आहे.”
मात्र ही सफाई अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवते—
—– तलाठी कार्यालय स्वतः अनुपस्थित असताना, फाईली खाजगी व्यक्तीकडे कशा दिल्या?
—– संमती देण्याचा अधिकार तलाठ्यांना आहे का?
—– कागदपत्रे खोलीतच सोडून कर्मचारी बाहेर कसे?
—– वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन का?—— महसूल विभागातील मोठ्या अनियमिततेचा फाटा उघड….
उरुळी कांचन तलाठी कार्यालयातील हा प्रकार एक प्रशासकीय अपयश आहे. सरकारच्या स्पष्ट आदेशानंतरही शासकीय महत्त्वाच्या दप्तरी कामकाजात खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप होत असेल, तर महसूल विभागातील कारभार किती बेफिकिरीने चालतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. नागरिकांनी अशा प्रकरणांची तपासणी, झाडाझडती आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Editer sunil thorat



