
मांजरी, (हडपसर) : मांजरी–शेवाळवाडी परिसरातील सुरू असलेली विकासकामे अंमलबजावणीपेक्षा ‘दर्शनी कामांवर’ अधिक भर देत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केलेल्या पाहणीनंतर महिनाभर उलटला असून, दिलेल्या पंधरा महत्त्वाच्या कामांपैकी अनेक कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. काही प्रकल्प केवळ नावापुरते सुरू असून प्रत्यक्षात प्रगती अत्यल्प आहे. यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून सामान्य नागरिकांत नाराजीचा सुर वाढला आहे.
आयुक्तांची पाहणी, कडक आदेश — तरीही कामांचा गती अभावी ठप्प कारभार….
ऑक्टोबर महिन्यात (ता. १८) आयुक्त राम यांनी मांजरी–शेवाळवाडी परिसरातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या दौऱ्यात अनेक कामांमध्ये झालेल्या विलंबावर त्यांनी नाराजी व्यक्त करून सहाय्यक आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करत कठोर पावले उचलली होती. त्याच दिवशी आयुक्तांनी परिसरातील रस्ते, कालवा, दुभाजक, सुरक्षा व्यवस्था, शाळांची अवस्था, अतिक्रमणे, कचरा समस्या, उड्डाणपुलावरील दिवे अशा पंधरा महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र वेळापत्रक देत स्पष्ट आदेश काढले होते.
एक दिवस, एक आठवडा ते एक महिना अशा टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र आज, त्या पाहणीला जवळपास ३० दिवस उलटत आले असतानाही कामांची स्थिती निराशाजनक आहे.
प्रमुख कामांची सद्यस्थिती : ‘काहीच बदल नाही’ असा नागरिकांचा सूर
१) उड्डाणपुलावरील दिवे – अद्याप बसविले गेले नाहीत. रात्री अपघातांचा धोका वाढवणाऱ्या या समस्येवर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश असूनही कोणतीही प्रगती दिसत नाही.
२) दुभाजकांची स्वच्छता आणि सुशोभीकरण – पूर्णतः थांबलेले मांजरी गाव ते उड्डाणपुलापर्यंतच्या दुभाजकांवर कचरा, गवत आणि मातीचे ढिगारे पाहायला मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे.
३) बेबी कालवा – कचरा व जलपर्णी ‘जैसे थे’ जवळपास दररोज वाढत जाणारा कचरा डासांच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरत असून, यावर कारवाईची गती शून्य.
४) शाळांमधील सुरक्षा व्यवस्था – उपलब्ध नाही. परिसरातील प्राथमिक शाळांना सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत कोणतेही पाऊल उचललेले नाही.
५) प्राथमिक शाळेची कुंपणभिंत – कामालाही सुरुवात नाही. शाळेच्या सुरक्षिततेशी संबंधीत हे काम असूनही ते अद्याप केवळ कागदावरच असल्याची टीका पालकांकडून.
६) अतिक्रमण – कारवाईची भाषा पण कृती नाही. मांजरी फाटा ते गाव अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. पण प्रत्यक्ष कारवाई दिसून येत नाही.
७) रस्त्यांवरील खड्डे – पुन्हा नव्याने निर्माण काही खड्डे बुजवले असा दाखवाच, परंतु प्रत्यक्षात नव्याने खड्डे वाढल्याची नागरिकांची नाराजी.
८) प्रवेशद्वारावरील कमानी – फलक लावून निभाव आयुक्तांनी स्वागत कमानी उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र कमानीऐवजी साधा बोर्ड लावून ‘काम झाले’ असा आभास निर्माण.
आयुक्तांना चुकीचा अहवाल देण्याची भीती!
या सर्व कामांची मुदत पुढील दोन दिवसांत संपत आहे. अनेक कामे पूर्ण न झाल्याने काही अधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडे चुकीचा किंवा अपूर्ण अहवाल पाठवला जाऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या १५ आदेशांची मूळ यादी…
१) जॉयव्हिला प्रकल्पाच्या एसटीपीची क्षमता तपासून दंडात्मक कारवाई
२) हामार्गावरील सेवा वाहिनीवर लोखंडी जाळी
३) प्रवेशद्वारावर स्वागत कमानी
४) शेवाळवाडी–मांजरी मार्ग रुंदीकरण
५) प्राथमिक शाळेला कुंपण, गेट, राडारोडा हटविणे
६) शााळांची सुरक्षा पूर्तता
७) दुभाजकांचे सुशोभीकरण
८) अतिक्रमण हटविणे
९) कालवा स्वच्छता
१०) उड्डाणपुलावरील दिवे
११) दुभाजक शेजारील माती काढणे
१२) भूसंपादन अहवाल
१३) पथदिवे, विजेसंबंधी कामे
१४) कचरा टाकणाऱ्यांवर दंड
१५) समस्या सोडवण्यासाठी PWD–पालिका संयुक्त बैठक
राहुल शेवाळे, माजी उपसरपंच, शेवाळेवाडी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले की “आयुक्तांनी दिलेली मुदत १८ तारखेला संपत आहे. काही कामे सुरू झाली असली तरी बहुतेक ठिकाणची अवस्था जसंच्या तशी आहे. मुदत संपल्यानंतर आम्ही पुन्हा पूर्ण आढावा घेऊन आयुक्तांकडे उर्वरित कामे तातडीने करण्याची मागणी करू.”
रवी खंदारे, सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्र यांनी म्हटले होते की “आमच्या विभागातील कामे पूर्ण केली आहेत. मुख्य खात्याच्या निविदा प्रक्रियेतल्या कामांवर लवकरच गती येईल.”
Editer sunil thorat



