तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट टोलनाका परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका इमारतीतील दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी दुकानातील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सदर घटना रविवार (१९ जानेवारी) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजु वसंत कदम (वय ५०, रा. कवडी माळवाडी, पोस्ट मांजरी फार्म, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजु कदम यांचे बालाजी टॉवर या इमारतीमध्ये शिवप्राज इंडिया प्रायव्हेट लिमीटेड या नावाने इलेक्ट्रिकल दुकान आहे. कदम हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. तेव्हा दुकानामध्ये शनिवारी दिवसभर माल विकून आलेली ५० हजार रुपयांची रोकड दुकानातच होती. रविवारी कदम हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकानापाशी आले तेव्हा त्यांना दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.
त्यानंतर कदम यांनी तत्काळ आत जाऊन दुकानातील गल्ला पहिला असता त्यामधील ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली नाही. त्यानंतर कदम यांना आपल्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची खात्री झाली. कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा