200 वर्षांत प्रथमच! महाराष्ट्राच्या 19 वर्षीय तरुणाने काशीमध्ये रचला इतिहास ; वेदमूर्ती देवव्रत महेश रेखेचं मोदींकडून कौतुक…

काशी | उत्तर प्रदेशातील काशीमध्ये वेद–संस्कृत अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची परंपरा असताना, महाराष्ट्रातील अवघ्या 19 वर्षीय तरुणाने तब्बल 200 वर्षांनंतर अभूतपूर्व असा ऐतिहासिक पराक्रम साधला आहे. अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे या तरुणाने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण पूर्ण करून दुर्मीळ असा मान पटकावला आहे.
या अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या दंड कर्म पारायणात जवळपास 2000 मंत्रांचे सरळ व उलट क्रमातील पठण विशिष्ट पद्धतीने करावे लागते. देशातील मोजक्या वेदपंडितांनाच हा अभ्यास पूर्ण करता येतो. देवव्रतने 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सलग 50 दिवस, दररोज सकाळी 8 ते 12 या वेळेत काशीतील रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात पारायण पूर्ण केले.
या उल्लेखनीय यशानंतर देवव्रत रेखेला ‘वेदमूर्ती’ ही प्रतिष्ठित उपाधी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अभूतपूर्व कामगिरीचं कौतुक करत देवव्रतच्या जिद्दीची व मेहनतीची प्रशंसा केली.
देवव्रत रेखेचा जन्म अहिल्यानगरमधील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील चंद्रकांत रेखे हे स्वतः विद्वान वेदपंडित असून देवव्रतचे पहिले गुरुही तेच आहेत. पाचव्या वर्षापासून देवव्रतने वेदपठणाचा अभ्यास सुरू केला आणि सततच्या साधनेतून अल्पवयातच वेदमूर्ती पदवीपर्यंतचा प्रवास गाठला.
गेल्या दोन शतकांत हा पराक्रम साधणारा देवव्रत हा दुसरा महाराष्ट्राचा विद्यार्थी ठरला आहे. यापूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी ‘देवदंड कर्म पारायण’ पूर्ण केले होते.
महाराष्ट्रातील छोट्याशा गावातून काशीच्या विद्यापीठापर्यंतचा आणि थेट वेदमूर्ती उपाधीपर्यंतचा देवव्रत रेखेचा प्रवास आज संपूर्ण देशभरातून कौतुकास्पद ठरत आहे.
Editer sunil thorat



