
हडपसर (पुणे) : पुणे पोलिसांच्या वतीने युवा आणि शैक्षणिक परिसरातील वाढत्या आव्हानांवर मार्गदर्शन करण्यासाठी “Secure Horizons in Education 2025” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भव्य सेमिनार व कॉन्क्लेव्हचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरियट येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि डिजिटल युगातील जबाबदार वर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी व्यासपीठ ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. सुरेश गोसावी, सिम्बायोसिसचे संस्थापक व कुलगुरू डॉ. एस. बी. मुजुमदार, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS), अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख (IPS), अँड. एस. के. जैन आणि डॉ. नितीन घोरपडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांवरील वाढत्या डिजिटल धोके या विषयांवर अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय सपकाळ, प्रा. मनिषा गाडेकर, तेजस दळवी, अहान दगडे आणि वेदिका अकोटकर यांनी सायबर गुन्ह्यांची स्वरूपे, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, पासवर्ड चोरी आणि सोशल मीडिया गैरवापर याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. सुरक्षित पासवर्ड कसे तयार करावेत, सार्वजनिक वाय-फाय वापरताना घ्यायची खबरदारी, अज्ञात लिंक्स व ईमेल तपासणीसारख्या महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पुणे पोलिसांचा मोठा सहभाग मिळाला. कॅम्पस शिस्त, गुन्हे प्रतिबंध, मानसिक आरोग्य, सुरक्षित डिजिटल वर्तन आणि जबाबदार नागरिकत्वावर तज्ज्ञांनी प्रभावी चर्चा केली.
सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे, पीएसआय अश्विनी जगताप, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थी सुरक्षा, सायबर जागरूकता आणि आत्मानुशासन यासाठी हा उपक्रम पुढील काळातही सातत्याने राबवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat




