लोणी काळभोरात पुन्हा राडा; वडिलांना मारहाण का केली असा जाब विचारणाऱ्या मुलास दगडाने ठेचले ; दोघांविरोधात गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : पठारेवस्ती परिसरात एका तरुणाला त्याच्या वडिलांवरील मारहाणीचा जाब विचारण्याचा प्रयत्न महागात पडला आहे. तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव यशवंत रोकडे (वय २०, रा. वार्ड क्र. ४, पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य कांबळे (वय २२) आणि सुशांत दगडे (वय 23, रा. पठारेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१५ ते ११.३० च्या सुमारास भगवा चौक, पठारेवस्ती येथे घडली.
घटना कशी घडली?
गौरव रोकडे हे घरी असताना त्यांना परिचित नितीन नाईकवाडे यांनी फोन करून “तुझ्या वडिलांना काही मुले मारहाण करत आहेत” अशी माहिती दिली. हे समजताच गौरव तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे आदित्य कांबळे व सुशांत दगडे हे त्यांच्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहताच त्यांनी कारण विचारले. मात्र आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकता शिवीगाळ करत गौरव यांना धक्काबुक्की केली, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गौरव यांचा मानलेला भाऊ दत्ता धायगुडे हा आला असता त्यालाही “मध्ये पडल्यास सुट्टी देऊ” अशी धमकी दिली. थोड्या वेळात परिस्थिती चिघळत असताना आदित्य कांबळे याने जमिनीवर पडलेला दगड उचलून थेट गौरवच्या डोक्यात वार केला. यात गौरव गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.
यानंतर आरोपींनी बिट्टू कोल्हापुरे आणि आकाश म्हस्के या दोघांना बोलावून घेत घटनास्थळावरून गायब झाले. काही वेळाने गौरवचे आजोबा व चुलते घटनास्थळी आले व जखमी गौरवला तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे करीत आहेत.
परिसरातील वाढत्या मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Editer sunil thorat



