सोरतापवाडी तलाठी कार्यालयात ‘खाजगी इसमांचे साम्राज्य’; पत्रकारांनाही धमक्या, वरिष्ठांकडूनच संरक्षण?

सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) : उरुळी कांचन येथील खाजगी इसमाच्या वावराचे प्रकरण अजून धुळीला बसत नाही तोच (दि.24) सोरतापवाडी तलाठी कार्यालयातही खाजगी व्यक्तींचा मुक्त संचार असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. महसूल विभागात गोपनीयतेचा पूर्ण बोजवारा उडाल्याची तक्रार करत शेतकरी विशाल वाईकर यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार घटनास्थळी पोहोचले असता एक खाजगी व्यक्ती तलाठी कार्यालयातील संगणकावर बसून सातबारा नोंदी, ऑनलाइन टपाल, अर्जांची स्थिती, फेरफार यांसारखी संवेदनशील कामे करताना दिसून आला. पत्रकारांनी त्याचे नाव विचारले असता तो व्यक्ती निःशब्द राहिला, मात्र त्याच क्षणी तो इसम अक्षय पिसाळ असल्याचा दावा तलाठी महादेव भारती यांनी केला. त्यानंतर तो व्यक्ती बाहेर येत पत्रकारांचेच मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत “तुम्ही कोण? काय काम आहे? इथे कशाला आला?” अशा अरेरावीच्या शैलीत पत्रकारांना धारेवर धरण्याचा प्रकार घडला. सरकारी दफ्तरात खाजगी इसमांची एवढ्या आत्मविश्वासाने उपस्थिती कशी आणि कोणाच्या ढालीवर असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांना विचारणा केली असता त्यांनी “अक्षय पिसाळ यांची पिक पाहणीसाठी थोड्या कालावधीपुरती नियुक्ती केली आहे; परंतु तो तलाठी कार्यालयात बसत असेल, संगणक वापरत असेल किंवा नोंदी हाताळत असेल तर ती माहिती घेऊन योग्य कारवाई करते,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र पिक पाहणीसाठी नियुक्त केलेला व्यक्ती तलाठी कार्यालयातील संगणकावर बसून सातबारा उतारे काढत, अर्ज तपासत आणि सरकारी टपाल उघडत असल्याचे दृश्य समोर आले असल्याने नियुक्ती प्रक्रियेवर आणि देखरेखीच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पिक पाहणीसाठी नियुक्ती करण्याचा काय आहे याची माहिती मिळाली नाही.
प्रांताधिकारी माने यांना पत्रकारांवरील अरेरावीबद्दल विचारले असता त्यांनी “तो व्यक्ती तुम्हाला धमकावत असेल किंवा अशिष्ट वागणूक देत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकता,” असे खोचक उत्तर दिले.
पण कारवाई करणार का नाही हा प्रश्न उनुत्तरीतच!
दरम्यान, सोरतापवाडी तसेच मंडल कार्यालयात खाजगी इसमांसाठी स्वतंत्र टेबल थाटल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले असून, “भीक नको पण कुत्रं आवरा” अशा संतप्त शब्दांत शेतकरी विशाल वाईकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पुढे आरोप केला की तत्कालीन तलाठी महादेव भारती, मंडळ अधिकारी श्रीमती बागले आणि अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या वरदहस्तानेच अक्षय पिसाळ आणि लक्ष्मण (भाऊसाहेब) चौधरी हे ‘खास मंडळी’ महसूल कार्यालयात आर्थिक व्यवहार, सातबारा फेरफार, डेव्हलपर भागातील दस्ताच्या नोंदी आणि अर्जांच्या गोपनीय माहितीचे व्यवहार चालवत आहेत. सातबारा पुस्तक हाताळणे, घोळ करणे, अनेकवेळा अर्जांची माहिती प्रतिवादींकडे आधीच पोहोचत असून त्यामुळे प्रतिवादी पळवाटा काढण्याची संधी घेतात आणि शेतकऱ्यांची प्रकरणे जाणूनबुजून लांबणीवर टाकली जातात, या खाजगी इसमाच्या तलाठी कार्यालयात वावराने शेतकरी यांच्या सातबारात बदल होऊ शकतो. अशी शक्यता नाकारता येत नाही. असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्याचा दावा आहे की दिड वर्षांपासून विविध अर्ज, फेरफार, हरकती, नोंदी आणि सर्वेक्षणाशी संबंधित प्रकरणांचा निकाल निघत नसून प्रत्येक वेळी कार्यालयात गेल्यावर हेच खाजगी इसम सरकारी दस्तऐवज हाताळताना दिसतात. नोटिसा इन्व्हलोपशिवाय दिल्या जातात, संवेदनशील माहिती कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्यांच्या हातात जाते, आणि प्रतिवादींपर्यंत सर्व तपशील आधीच पोहोचत असल्याने न्यायाची संधीच राहात नाही. महसूल विभागाच्या गोपनीयतेवर आणि शेतकऱ्यांच्या अधिकारावर असा खुलेआम अतिक्रमण होत असतानाही प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा तालुकाभर पसरली आहे.
सोरतापवाडीच्या महसूल कार्यालयावर खाजगी इसमांचे वर्चस्व, पत्रकारांना दिलेली धमकी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर सुरू असलेले आर्थिक व्यवहार आणि नोंदी फेरफार करण्याचे आरोप या सगळ्या प्रकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. संबंधित सर्व महसूल अधिकाऱ्यांची चौकशी, खाजगी व्यक्तींची तात्काळ हकालपट्टी, मागील तीन वर्षांतील सर्व फेरफार–नोंदींची तपासणी आणि पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून यावर निर्णायक कारवाई न झाल्यास महसूल विभागाबद्दलचा विश्वास उध्वस्त होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.



