जिल्हाराजकीयसामाजिक

कवडीमाळवाडीला पाणीटंचाईतून दिलासा, ६ लाख लिटर क्षमतेच्या पाणीटाकीच्या भूमिपूजनाने जलपुरवठा योजनाला गती…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा गंभीर सामना करणाऱ्या कवडीमाळवाडी परिसरातील नागरिकांसाठी रविवारी (ता. २३) ऐतिहासिक दिवस ठरला. ६ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन सोहळ्याने जलपुरवठा समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनेची अधिकृत सुरूवात झाली. हा कार्यक्रम कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने माजी आदर्श सरपंच गणपत बापू काळभोर यांच्या हस्ते संपन्न झाला.

८९ कोटींच्या योजनेत महत्त्वपूर्ण टप्पा…

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. तथापि, कवडीमाळवाडीतील दहा हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू होण्यात अडथळे येत होते. अखेर ग्रामपंचायतीने स्वतंत्र जलसाठा उभारण्याचा निर्णय घेत प्रकल्पाची गती वाढवली.

या अंतर्गत नायर कुटुंबाची चार गुंठे जागा ८४ लाख रुपयांमध्ये विकत घेण्यात आली. त्यासाठी ४२ लाख रुपये शासनाकडून तर उर्वरित ४२ लाख रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले. उद्योजक बाबुशेठ काळभोर यांनी ५ लाखांची मदत दिली. बाजारभाव वाढल्याने नवपरिवर्तन फाउंडेशनने अतिरिक्त ४ लाख रुपये देऊन व्यवहार पूर्णत्वास नेला.

चित्तरंजन गायकवाड : “अडथळे आले, पण मागे फिरलो नाही”

यावेळी बोलताना माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे गावाला ८९ कोटींचा निधी मिळाला. योजना राबवताना अनेकांनी आडकाठी आणली, पण आम्ही चंग बांधला होता — काहीही झाले तरी ही योजना पूर्ण करणारच. नागरिकांच्या घराघरांत नळातून पाणी येईपर्यंत संघर्ष थांबणार नाही.” ते पुढे म्हणाले, “गावाच्या विकासात कोणीही अडथळा आणू नये. नागरिकांच्या अडचणी असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा. आम्ही निपक्षपातीपणे प्रश्न सोडवत राहू.”

ग्रामस्थांचे योगदान निर्णायक…

भूमिपूजनाच्या दिवशी माजी सरपंच गणपत काळभोर यांनी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याबद्दल गायकवाड यांनी सर्व देणगीदार, ग्रामस्थ व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले. लोकवर्गणी उभी राहणे, जमीन जुळवून आणणे आणि प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे तीन टप्पे पूर्ण झाल्यामुळे पुढील काही महिन्यांत पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दीर्घकाळाची टंचाई संपण्याची आशा…

कवडीमाळवाडी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. नव्या जलसाठ्यामुळे दहा हजार लोकसंख्येला शाश्वत पाणीपुरवठा, टँकरवरील अवलंबित्व कमी, घराघरात नियमित नळजोडणी, भविष्यातील वाढीव गरजांसाठी क्षमता राखीव अशी महत्त्वपूर्ण परिणामकारक सुधारणा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती…

कार्यक्रमाला लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, माजी उपसरपंच राजश्री काळभोर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय चांदणे, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सिमीता लोंढे, बिना काळभोर, अविनाश बडदे,सोनाली शिंदे, कोमल काळभोर,माजी सदस्य जयसिंग घाडगे, सूर्यनारायण काळभोर, मुकुंद काळभोर, चंद्रदिप काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, नितीन टिळेकर, सुनिल घोरपडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??