लोणीतील जगताप हाइट्समध्ये गॅस गळतीचा भीषण स्फोट ; महिला गंभीर भाजल्या, दुचाकीस्वाराचा हात फ्रॅक्चर, इमारतीला मोठे नुकसान…

तुळशीराम घुसाळकर
लोणी (ता. हवेली) : नेहरू चौकाजवळील जगताप हाइट्स इमारतीत सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस गळतीमुळे अचानक झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. या स्फोटात घरात एकट्या असलेल्या करूणा मनोज जगताप गंभीररित्या भाजल्या आहेत, तर फुटलेली लोखंडी ग्रीलसह खिडकी रस्त्यावर कोसळल्याने दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाच्या हाताचे हाड मोडले आहे. दोघांनाही लोणी काळभोर येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून करुणा जगताप यांची प्रकृती चिंताजनक आहे.
करूणा जगताप या पहिल्या मजल्यावर आपल्या पती व दोन मुलांसह राहतात. स्फोटाच्या वेळी पती कामावर गेले होते तर मुले शाळेत असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. घरात दोन गॅस सिलिंडर आणि गॅस गिझर बसवलेला होता. अचानक गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की संपूर्ण घराचे दरवाजे, खिडक्या आणि काच तुटून घरात व रस्त्यावर विखुरले. घरातील बहुतेक वस्तू जळून खाक झाल्या. दिवाळीनंतर घरात शिल्लक राहिलेले फटाकेही या स्फोटात जोरात फुटले. या भीषण विस्फोटामुळे इमारतीत हलकल्लोळ उडाला.
दरम्यान, स्फोटाच्या क्षणी नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून जात होते. घरातील खिडकीचा मोठा लोखंडी फ्रेमसहित तुकडा रस्त्यावर कोसळला आणि त्यापैकी एका तरुणाच्या हातावर आदळला. या धडकेत त्याच्या हाताचे हाड मोडले आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, सहाय्यक फौजदार रामदास मेमाणे, हवालदार मंगेश नानापुरे, मल्हारी ढमढेरे तसेच सरपंच नागेश काळभोर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.
स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तो सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे झाला की गिझरचा स्फोट झाला, अथवा घरात पडून राहिलेल्या फटाक्यांमुळे उद्भवलेली प्रतिक्रिया होती, हे फोरेन्सिक तपासणीनंतरच निश्चित होणार आहे. घटनास्थळी फोरेन्सिक टीम दाखल झाली असून तज्ञांकडून सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप आणि इतर साहित्याची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच पाषाणकर गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आदम इनामदार हे तांत्रिक कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सिलेंडर, रेग्युलेटर व पाईपलाइनची बारकाईने पाहणी केली असून, त्यांच्या तांत्रिक अहवालानंतर स्फोटाचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात काच व मलबा पडून राहिल्याने परिसरातील नागरिक घाबरले असून, पोलिसांनी जागा सुरक्षित करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत
Editer sunil thorat




