
हडपसर (पुणे) : १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जेएसपीएम, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे यांच्या वतीने एड्स विरोधी जागरूकता वाढविण्यासाठी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावर्षीचा जागतिक थीम “Overcoming Disruption, Transforming the AIDS Response” असा असून, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या विषयाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाली. रेड क्रॉसचा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन संस्थेचे संकुल संचालक डॉ. मारुती काळभांडे यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर्स, बॅनर्स व प्रभावी घोषणांच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्सविषयी माहिती, प्रतिबंधक उपाय, सुरक्षित वर्तनाची गरज आणि नियमित तपासणीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य हा रॅलीचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. एचआयव्ही/एड्ससंदर्भातील गैरसमज, समाजातील कलंक, प्रतिबंधक उपाय, संक्रमित व्यक्तीविषयी संवेदनशीलता आणि उपलब्ध उपचारांची माहिती त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत मांडली. नागरिकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “एड्सविषयी बोलू खुलेपणाने”, “जागरूकता हेच संरक्षण”, “भेदभावाला नाही म्हणूया” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आडकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी समाजहितासाठी पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. एड्ससंबंधीचे गैरसमज दूर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि कलंक निर्मूलन करणे ही आजची गरज आहे.” शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या प्रशंसनीय जनजागृती कार्याचे कौतुक माननीय आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. हडपसर संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळभांडे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन प्राध्यापिका अनुराधा पाटील यांनी केले असून प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन ममडगे, प्रा. तनुजा काशिद, विवेक थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, स्वाती माकोणे, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पवार काका, कल्पना सुरवसे आणि आकांक्षा जाधव यांनी उत्साही सहकार्य केले.
समारोपात प्राचार्यांनी सांगितले की, “रॅली आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करणे ही विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी बाब आहे. एड्सविषयी वैज्ञानिक माहिती पोहोचवणे आणि समाजातील कलंक निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे.”
जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेला हा उपक्रम जागतिक एड्स दिनाच्या उद्देशाला साजेसा ठरला.
Editer sunil thorat






