
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जुना पुणे–सोलापूर रोड ते गोठा परिसर हा वाढत्या नागरी वस्तीमुळे महत्त्वाचा मार्ग बनला असला, तरी अनेक वर्षांपासून या भागात पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव जाणवत होता. विशेषतः संध्याकाळीनंतर महिलांना व विद्यार्थ्यांना अंधारात प्रवास करताना असुरक्षितता, भीती आणि अपघातांची शक्यता कायम होती. नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत ग्रामपंचायतीने हे काम प्राधान्याने राबवण्याचा निर्णय घेतला आणि 15 व्या वित्त आयोगातून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाला गती देण्यात आली.
या कामाचा औपचारिक शुभारंभ रविवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता गोठा परिसरात करण्यात आला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
स्ट्रीट लाईट बसविल्याने गोठा परिसरातील मुख्य रस्ता, वस्तीच्या आतल्या गल्ल्या आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना मोठा दिलासा मिळणार आहे. रात्रीच्या वेळी होणारी असुरक्षितता कमी होऊन महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नोकरदार वर्गाला सुरक्षितपणे प्रवास करता येईल. तसेच परिसरात वाढत्या असामाजिक प्रकारांना आळा बसण्यासही मदत होणार आहे.
कार्यक्रमाला मा. सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड, उपसरपंच नासीर पठाण, माजी सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सलीमा ताई पठाण, शब्बीर पठाण, दीपक आप्पा काळभोर, विकी नामुगडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय देत हे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
नागरिकांनीही स्ट्रीट लाईटच्या कामास दिलेला वेग, निधीची प्रभावी उपलब्धता आणि ग्रामपंचायतीचे त्वरित पाऊल याचे कौतुक केले. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ही प्रकाशयोजना निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कदमवाकवस्तीच्या विकासयात्रेत गोठा परिसरातील हा महत्त्वाचा टप्पा ठरत असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण मार्ग उजळून निघणार आहे.
Editer sunil thorat




