घरासमोर लघवी केल्याचे हाटकले म्हणून परप्रांतीय शिक्षकाची शेतकऱ्यावर मारहाण ; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल…

लोणी काळभोर (ता. हवेली) : घरासमोर लघवी करताना दिसल्याने फक्त हाटकले, याचा राग येऊन एका परप्रांतीय शिक्षकाने शिवीगाळ, दमदाटी करत शेतकऱ्यावर हाताने व ठोश्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी, थेऊर फाटा परिसरात घडली आहे. या प्रकारानंतर संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी शिवाजी कांतीलाल काळभोर (वय 43, रा. कुंजीरवाडी, थेऊर फाटा, ता. हवेली) यांच्या तक्रारीवरून आनंद मोहन कुलकर्णी (वय 38, रा. घर क्र. 79, सुहाग कॉलनी, विजापूर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर हे शेतातील गव्हाला पाणी देऊन घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर आनंद कुलकर्णी लघवी करताना दिसले. त्यांनी त्याला हाटकले असता कुलकर्णी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत “तु मला विचारणारा कोण?” म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तत्पश्चात त्यांनी काळभोर यांना हाताने व ठोश्याने बेदम मारहाण केली.
मारहाणीच्या दरम्यान पाठीमागून दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे काळभोर खाली कोसळले. त्यामुळे त्यांच्या कपाळाला, नाकाला आणि ओठाला मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. यामध्ये त्यांचा वरील बाजूचा एक दात पडला, तर डाव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या बोटाला जखमा झाल्या. तत्काळ मदतीसाठी काळभोर यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविले.
यानंतर जखमी काळभोर यांना उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे हलवण्यात आले. उपचारानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी शिंदे करत आहेत.
Editer sunil thorat



