
मुंढवा (पुणे) – मुंढवा येथील बहुचर्चित महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणावर न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी मूळ वतनदारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज सहाव्या दिवशीही तीव्रतेने सुरू राहिले. २६ नोव्हेंबर २०२५ पासून दररोज सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा वतनदारांनी दिला आहे.
या प्रकरणात जमीन मूळ वतनदारांच्या नावे करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, तसेच जमीन व्यवहारात कथित भ्रष्टाचार, नियमभंग व बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी केली जात आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व संबंधित अधिकारी वर्गाची तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा जोरदार केली.
आंदोलनामध्ये आजही मूळ वतनदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रकाश ढाले, सतीश गायकवाड, रोहन जाधव, महेंद्र लोंढे, अमोल गायकवाड, नितीन गायकवाड, सुभाष गायकवाड, संतोष गायकवाड, ऋषिकेश हरिभक्त, महेंद्र चव्हाण, निलेश गायकवाड यांसह अनेक वतनदार उपस्थित राहिले. सर्वांनी एकमुखाने आपल्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
उर्वरित सर्व वतनदारांनीही या आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम पवित्रा सर्व वतनदारांनी घेतला आहे. मुंढवा येथील हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून शासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी अधिक जोमाने पुढे येत आहे.
Editer sunil thorat



