
कदमवाकवस्ती (हवेली) : अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर “आरक्षण क्रांती महापदयात्रा” मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा २ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक, सुमननगर, चेंबूर येथून सुरू झाली असून, मातंग समाजाच्या विविध जिव्हाळ्याच्या मागण्या मांडण्यात येत आहेत.
या पदयात्रेचा सहावा मुक्काम हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे ७ नोव्हेंबर रोजी झाला. या ठिकाणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे, युवा नेते ज्ञानेश्वर नामुगडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात आले.
सभेत सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले की, “आरक्षण उपवर्गीकरण हे सविधानिक मार्गाने व्हावे, आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी आपल्या भाषणात आरक्षणाचे महत्त्व, त्यामागील सामाजिक न्यायाची गरज व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी का आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सर्व समाजबांधवांना १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या यात्रेच्या प्रमुख मागण्या : अनुसूचित जातीतील १३% आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे, मातंग समाजावरील अन्याय-अत्याचारांना आळा घालून गुन्ह्यांची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचा अहवाल अंमलात आणावा, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, डॉ. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला १००० कोटींचे भांडवल द्यावे, मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू करून ५ लाखांचे अनुदान द्यावे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार द्यावा, भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजनेंतर्गत जमिनीकरिता २५ ते ३५ लाखांची मदत द्यावी.
कार्यक्रमास विजय बोडके (राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष), दत्ता जगताप (लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष), विजय सकट (जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष), संजय रणदिवे (उपाध्यक्ष), गणेश थोरात (कार्याध्यक्ष), तसेच अनेक कार्यकर्ते व भगवा प्रतिष्ठान जय हिंद ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Editer sunil thorat



