१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजी प्रवेश’ ॲप अनिवार्य ; ऑफलाइन प्रवेशपत्र बंद…
मुंबई : मंत्रालयातील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी फक्त ‘डीजी प्रवेश’ ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच परवानगी मिळणार आहे. ऑफलाइन पद्धतीने खिडकीवरून प्रवेशपत्र देण्याची सुविधा पूर्णतः बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली.
सध्या अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक असला तरी, दुपारी दोननंतर प्रवेशासाठीच्या खिडक्यांवर मोठी गर्दी होत होती. ग्रामीण भागातून येणाऱ्या व स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठीच खिडकीवर प्रवेशपत्राची सुविधा ठेवण्यात आली होती. मात्र, वाढत्या गर्दीमुळे आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ ऑगस्टनंतर मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी अभ्यागतांना ‘डीजी प्रवेश’ ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून, दहा अंकी मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींसाठी पर्यायी यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू असल्याचेही निकम यांनी सांगितले.
यापूर्वी मंत्रालयात मंत्र्यांना, आमदारांना व त्यांच्या सहाय्यकांना भेटण्यासाठी लागणाऱ्या रांगांमुळे वेळेचा मोठा अपव्यय होत असे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर ही रांग भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचत असे. ‘डीजी प्रवेश’ ॲप सुरू केल्यानंतरही गर्दी कमी झाली नव्हती, त्यामुळे हा कडक निर्णय घेण्यात आला आहे.
Editer sunil thorat




