मुख्य सचिवपदी राजेश अगरवाल ; राजेश कुमार मीना निवृत्त, प्रशासनात नवी समीकरणे…

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी 1989 बॅचचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजेश अगरवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 डिसेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारतील.
सुजाता सौनिक यांच्या निवृत्तीनंतर सर्वात ज्येष्ठ असल्याने मीना यांची जून 2025 मध्ये मुख्य सचिव म्हणून निवड झाली होती. केवळ दोन महिन्यांचा कार्यकाळ असूनही त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या निवृत्तीनंतर राज्य प्रशासनाची सूत्रे अगरवाल यांच्या हाती जाणार आहेत.
आयआयटी दिल्लीमधून संगणक शाखेचे शिक्षण घेतलेल्या अगरवाल यांनी अकोला आणि जळगाव जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, राज्यातील वित्त व आयटी विभागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. केंद्र पातळीवर डिजीलॉकर, आधार, जनधन आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रकल्पांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
अगरवाल यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ निश्चित होताच, मुख्य सचिवपदासाठी चर्चेत असलेले गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, तसेच ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर यांना पुन्हा एकदा संधी न मिळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्य प्रशासनात नेतृत्वबदल झाल्याने मंत्रिमंडळ आणि मंत्रालयीन कामकाजात नवीन समीकरणे व गती निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



