व्हाट्सॲप स्टेटसच्या वादातून अवैध धंदेचालकाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण…
व्हाट्सॲप स्टेटसचा राग काढत वाद

तुळशीराम घुसाळकर
पुणे (ता.हवेली) : मोबाईलवर ठेवलेल्या व्हाट्सॲप स्टेटसचा राग मनात धरून अवैध धंदे करणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने दोन साथीदारांच्या मदतीने महिलेसह तिघांना बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरातील म्हस्कोबा मंदिर समोरील रस्त्यावर शुक्रवार (५ सप्टेंबर) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश बाळू बागडे (वय २०), त्याची आई कल्पना बाळू बागडे व योगेश नागनाथ कांबळे या तिघांना मारहाण झाली. यात आकाशच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून तो गंभीर जखमी आहे. याप्रकरणी शंकर तानाजी धायगुडे (वय २८), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय २८) व अक्षय गहिनीनाथ मस्तुद (वय २९, सर्व रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) यांच्यावर मारहाण, शिवीगाळ, जखमी करणे अशा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश बागडे हा रिक्षा चालक असून शुक्रवारी रात्री तो मित्रासह म्हस्कोबा मंदिराजवळ उभा असताना शंकर धायगुडे तेथे आला. त्याने व्हाट्सॲप स्टेटसचा राग काढत आकाशशी वाद घातला. दरम्यान त्याचा साथीदार अक्षय मस्तुद याने लाकडी दांडक्याने आकाशच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर धायगुडे व वाघमारे यांनी आकाश व योगेश कांबळे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. मध्यस्तीला आलेल्या कल्पना बागडे यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
फिर्यादी आकाश बागडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, शंकर धायगुडे हा अवैध धंदे करणारा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्याच्यावर यापूर्वी शासकीय कामात अडथळा, दंगल घडवून आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, आत्महत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तरीही तो पुन्हा मारहाणीच्या घटनेत अडकला आहे. त्यामुळे “या अवैध धंदेचालकाची मुजोरी अखेर कधी थांबणार?” असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
Editer sunil thorat



