
वारजे माळवाडी (पुणे) : सिल्वर स्प्रिंग चॅरिटेबल फाउंडेशन संचलित विद्याश्रम स्कूल, वारजे माळवाडी येथे आज दिनांक 29 नोव्हेंबर, शनिवार सकाळी साडेसहा वाजता आयोजित दुसऱ्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटेच्या थंडगार वातावरणातही शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्पर्धेला सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण प्राप्त झाले.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. परिमला सुब्रमण्यम, विशेष कार्यकारी अधिकारी अॅड. किशोर रासकर तसेच उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक अर्जुन तागुंदे उपस्थित होते. उद्घाटनानंतर विविध गटांमध्ये मिनी मॅरेथॉनची सुरुवात झाली. निर्धारित मार्गावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गती राखत दमदार धाव घेतली.
स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात डॉ. परिमला सुब्रमण्यम यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पदके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. तसेच अर्जुन तागुंदे यांनी या वर्षी विशेष उपक्रम म्हणून विजेत्यांना रोख पारितोषिकांचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची दखल घेतली. शाळेच्या प्राचार्या सविता मोरे व विशेष कार्यकारी अधिकारी अॅड. रासकर यांच्या हस्ते सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर स्मृतीचिन्हे देण्यात आली.
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन, व्यवस्थापन, सुरक्षितता यांसह सर्व तयारीत मनापासून परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ, निरोगी जीवनशैलीबद्दल जनजागृती आणि खेळांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
विद्याश्रम स्कूलच्या उपक्रमांचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण ठरले असून विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि पालकांचा प्रतिसाद यामुळे पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आयोजित करण्याचा शाळा प्रशासनाचा मानस आहे.
Editer sunil thorat






