
मुंबई : राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे ती आता २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टिका सुरू केली आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागांत ईव्हीएम बंद पडणे, कार्यकर्त्यांमध्ये चकमकी, न्यायालयीन पेच असे गंभीर प्रकार घडले. काही प्रभागांमध्ये मतदानच पुढे ढकलत २० डिसेंबरची नवी तारीख जाहीर झाली. या अस्थिरतेतच एका याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले—सर्व नगरपरिषदांचे निकाल २१ डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करावेत. तसेच २० डिसेंबरच्या मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोलला परवानगी देण्यात आली.
या निर्णयाने संपूर्ण राजकीय पटल ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली; तर विरोधकांनी सरकारची कोंडी करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
यात सर्वाधिक चर्चा झाली ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या फक्त चार शब्दांतील टिप्पणीची. त्यांनी ठाम शब्दांत सरकारवर टीका करत म्हटले—“देशात मनमानी सुरू आहे.” या एका वाक्यातून त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निर्णयाला “निवडणुकीचा खेळखंडोबा” ठरवत सरकार व निवडणूक आयोगावर सरळ आरोप केला. “हा पोरखेळ आहे. निकाल ढकलणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे. हा मतचोरीचा प्रकार नाही ना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील आयोग सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला.
निवडणूक प्रक्रियेत वाढलेला गोंधळ, मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय, आणि विरोधकांनी उपस्थित केलेले संशय—यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या विश्वसनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Editer sunil thorat



