
हडपसर (पुणे) : शेवाळेवाडी परिसरातील वाढत्या नागरीकरणासह वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेवाळेवाडी पीएमटी डेपोच्या आवारात नवीन अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन) उभारण्यासाठी अधिकृतरीत्या मागणी करण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अलीकडेच पुणे–सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी फाटा येथे डिझेलने भरलेला टँकर पेटल्याची गंभीर घटना घडली होती. स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेतून परिसरातील आपत्कालीन सेवांची आवश्यकता अधोरेखित झाली.
नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये कुठेही अग्निशमन केंद्र नसल्याने आग लागल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यात अडचणी येत आहेत. शेवाळेवाडी–मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प, गृहसंख्या वाढ आणि औद्योगिक क्रियाकलापांमुळे आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.
या पावलामुळे शेवाळेवाडी–मांजरी परिसरातील नागरिकांना तत्काळ आणि प्रभावी अग्निशमन सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Editer sunil thorat




