
लोणीकंद (पुणे) : यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धेच्या बीटस्तरीय उपांत्य फेरीत लोणीकंद येथे आज रंगलेल्या स्पर्धांमध्ये जि.प. प्राथमिक शाळा पिंपरी सांडसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बहुआयामी प्रतिभेची चमकदार छाप उमटवत घवघवीत यश संपादन केले. दिवसाभर सुरू असलेल्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कटतेने, तयारीने आणि आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत विविध उपक्रमांत प्रथम व तृतीय क्रमांक पटकावले. लोकनृत्य स्पर्धेत शाळेच्या पथकाने अप्रतिम प्रस्तुती देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली व प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेत सादरीकरणाची मानाची संधी मिळवली. लोकनृत्याची लयबद्धता, वेशभूषेची आकर्षकता आणि संघातील विद्यार्थ्यांमधील एकसंधता पाहणाऱ्यांना राज्यस्तरीय सादरीकरणाची झलक दाखवून गेली. याचबरोबर कविता गायन आणि बडबडगीत या विभागांतही विद्यार्थ्यांनी अतिशय भावपूर्ण, स्पष्ट व नेटक्या सादरीकरणातून परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांकावर आपली छाप पाडली.
क्रीडा विभागातही विद्यार्थ्यांनी तितकीच चमक दाखवली. वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थिनींनी आपला शब्दसामर्थ्यपूर्ण आत्मविश्वास सिद्ध केला. तसेच लांबउडी स्पर्धेत मुलींनी दमदार प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या मा. अध्यक्ष कैलास भोरडे, मा. अध्यक्ष विकास भोरडे, मुख्याध्यापिका संजीवनी देंडगे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. तसेच सहकारी शिक्षक राजू चिंचकर व श्रीमती तृप्ती पारधे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने दिलेले मार्गदर्शन, सरावातील शिस्त आणि योग्य दिशादर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात व्यावसायिकता आणि आत्मविश्वास दिसून आला.
नेहमीप्रमाणेच या वर्षीही पिंपरी सांडस शाळेच्या लहानग्यांनी मेहनत, चिकाटी आणि कलाविष्कारातून आपला ठसा उमटवला असून आता तालुकास्तरीय स्पर्धेतही अशाच दणदणीत कामगिरीची शाळेला आशा आहे. संपूर्ण गावातून आणि पालकांकडून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शाळेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
Editer sunil thorat




