लखनौ येथे झालेल्या १९ व्या राष्ट्रीय जांभोरीत गोल्डन सियारा पब्लिक स्कूलची मुलाखम चमक ; महाराष्ट्राची शान उंचावली…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लखनौ (उत्तर प्रदेश) येथे रविवार, २३ नोव्हेंबर ते शनिवार, २९ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या १९ व्या राष्ट्रीय जांभोरी स्काऊट आणि ग्रँड फायनल डायमंड ज्युबिली स्पर्धेत गोल्डन सियारा पब्लिक स्कूलच्या १८ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. पुणे जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे, जिल्हा संघटक गाईड उषा हिवराळे, तसेच दिलीप नवसे आणि जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे पथक राष्ट्रीय पातळीवर चमकले.
या भव्य जांभोरीत देशभरातील २७ राज्यांमधून आणि ४ देशांमधून तब्बल ३५ हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून ८० स्काऊट आणि ८० गाईडची निवड झाली होती, त्यामध्ये गोल्डन सियाराच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हीच मोठी कामगिरी मानली जात आहे.
जांभोरीचे उद्घाटन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते झाले, तर शेकोटी कार्यक्रमातील लोककला नृत्य विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. या प्रतिष्ठित कार्यक्रमाची सांगता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
स्पर्धेदरम्यान संचलन, शोभायात्रा, ग्रुप डान्स, फूड प्रदर्शन, कलर पार्टी, कॅप क्राफ्ट, नाईट हाइक, प्रायरिंग प्रोजेक्ट अशा विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत महाराष्ट्राची शान वाढवली. विशेषतः शेकोटी कार्यक्रमातील महाराष्ट्र दर्शन या लोककलेवर आधारित नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांची दाद मिळवली.
या पथकात सोहम कुंभार, आदित्य उपासे, आदर्श नाटकरे, तुफान विश्वकर्मा, बापियान हुसेन, निर्भय जाधव, रुद्र राऊत, कुंदन अडलिंग, शार्दुल गायकवाड, कृतिका मगर, तन्वी भिसे, श्रीशा धाट, नंदिनी चव्हाण, समृद्धी दवणे, समीक्षा हिवरकर, रिक्षा रेड्डी आणि प्रतीक्षा सोनटक्के या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सहभागी विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत १० वाढीव गुण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे.
या विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर हेमंत डोईफोडे, अभिषेक जाधव आणि गाईड कॅप्टन सुनिता जगताप यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्कूल कमिटी अध्यक्ष शैलेश चंद, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
गोल्डन सियाराच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शाळेचा नावलौकिक देशभर उजळून निघाला आहे.
Editer sunil thorat



