यवत मध्ये काळी जादूचा थरकाप उडवणारा प्रकार ; ३० जणांची नावे लिहून करणी केल्याचा आरोप, चुलत्यावर गुन्हा दाखल…

यवत (पुणे) : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळी जादू, करणी आणि जादूटोणा प्रथेतून दहशत पसरविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नरबळी, अन्य अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून ३० जणांची नावे लिहून करणीचा अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप कुटुंबातीलच चुलत्यावर करण्यात आला आहे.
फिर्यादी संजय दत्तू पवार (वय ४०, रा. पाटस पंचशील नगर, ता. दौड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता शेजारी वैभव अशोक पानसरे यांनी “तुमच्या घरासमोरच्या चौकात करणीसारखी वस्तू ठेवलेली आहे” असे सांगत त्यांना जागे केले. तत्काळ घटनास्थळी गेल्यावर संजय पवार यांनी पाहिले असता, पिवळे लिंबू, त्याला लवंगा व टाचण्या टोचलेल्या, तसेच त्यावर हळद, कुंकू आणि काळा बुका टाकलेला असल्याचे दिसले.
त्याच्या शेजारी पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने ३० व्यक्तींची नावे लिहिलेली आढळली. ही सर्व नावे पवार कुटुंबातीलच असल्याने परिसरात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेथे अशोक नल्हारी पानसरे, मंगला पानसरे, युवराज पवार, संतोष पवार आदी लोक उपस्थित होते व सर्वजण भीतीत चर्चा करत असल्याचे फिर्यादीने सांगितले.
फिर्यादी संजय पवार यांना त्या कागदावरील अक्षर हे चुलते शंकर काशीनाथ पवार यांचे असल्याचा संशय आहे. पूर्वी झालेल्या कौटुंबिक वादातूनच कुटुंबाला मानसिक त्रास व सामाजिक दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार मुद्दाम केला असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. महिलांमध्ये व मुलांमध्ये भीती निर्माण करण्याचाही हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 999/2025 नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 3(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचा जबाब घेऊन त्याची नोंद पोसई अक्षय मोरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Editer sunil thorat



