
मांजरी बु (हडपसर) : मांजरी गावातील मनपा शाळेला आज विकासकामांचा मोठा ‘वर्धापन दिन’ लाभला. तब्बल ५० लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे, माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, ग्रामपंचायत सदस्य अमित घुले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला आंबीलकर यांच्या हस्ते या कामांची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
माननीय आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भरीव सुधारणा करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सीमा भिंत बांधकाम, स्वागत कमान, विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण उभारणी, आधुनिक लायब्ररी, तसेच परिसराचे सुरक्षित आणि आकर्षक रूपांतर यांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी मागणी करून पाठपुरावा करणाऱ्या राहुल शेवाळे यांचा आजच्या भूमिपूजनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, “विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शारीरिक प्रगती आणि सुरक्षितता यांचा विचार करून ही कामे राबवली जात आहेत. उत्तम वातावरण, सुरक्षित परिसर आणि आधुनिक सुविधा मिळाल्यास विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती निश्चित होईल. पुढील काही महिन्यांत ही शाळा ‘स्मार्ट शाळे’च्या श्रेणीत सामील करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.”
या कामांमुळे शाळेला मजबूत संरक्षक भिंत, सुरक्षित आवार, मुलांसाठी खेळाचे स्वतंत्र मैदान, वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रशस्त लायब्ररी असे बहुआयामी फायदे मिळणार आहेत. पालक आणि शिक्षकांनी या विकासकामांचे मनापासून स्वागत केले.
कार्यक्रमाला माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, अमित घुले, अविनाश भंडारी, तेजस कलाल, विशाल जाधव, तसेच पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका शकुंतला आंबीलकर यांनी शाळेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल माननीय आयुक्तांचे विशेष आभार मानले.
मांजरी गावातील मनपा शाळेला मिळालेली ही विकासाची गती आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल घडवेल, अशी एकमुखी प्रतिक्रिया कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.
Editer sunil thorat





