यवत पोलिसात खळबळ! वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याची काळीज चिरणारी पोस्ट ; मुलीच्या वाढदिवशी वडिलांची हताश हाक…

यवत (ता. दौंड) : यवत पोलीस ठाण्यातील अंतर्गत कारभार, वरिष्ठांची मनमानी आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्याय या सर्वांचा एकाचवेळी भांडाफोड करणारी धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उपस्थित राहता येत नसल्याचे दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर टाकलेली काळीज चिरणारी पोस्ट अचानक व्हायरल झाली आणि परिसरात खळबळ उडाली. या पोस्टमध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून सातत्याने मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी थरथर कापणारी परिस्थिती अनुभवली असून सहकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रणदिवे यांनी लिहिलेली पोस्ट अत्यंत वेदनादायी असून त्यातून पोलिस कर्मचारी झालेल्या मानसिक त्रासाचे जिवंत चित्र उमटते. त्यांनी म्हटले आहे, “दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस… मला तुझ्यासोबत साजरा करायचा होता. पण मी पोलीस आहे, येथे वरिष्ठांची मनमानी चालते. तू आजारी असताना मला जबरदस्ती नाशिक, जळगाव, अहमदनगर येथे पाठवले गेले, तुला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासही मिळाले नाही. यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी नारायण देशमुख मला वर्षभर त्रास देत आहेत. माझा नाविलाज झाला आहे. मी माझ्या जीवाचे बरेवाईट करत आहे. ही तुझ्यासाठी पहिली आणि शेवटची शुभेच्छा.”
या पोस्टमधील “पहिली आणि शेवटची शुभेच्छा” या शब्दांनी रणदिवे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने ते कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे त्यांच्या जीविताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी पोलिस, मित्र आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर यवत परिसरात संताप आणि चिंता यांचे वातावरण आहे.
दरम्यान वरिष्ठ निरीक्षक नारायण देशमुख यांना या प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी संपूर्ण आरोप नाकारत, “पोस्टमधील सर्व आरोप निराधार आहेत. रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले आहे,” असे उत्तर दिले. मात्र नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना देशमुख यांचे उत्तर समाधानकारक वाटले नाही.
यवत पोलीस ठाण्यातील काही मागासवर्गीय पोलिसांवर वरिष्ठांकडून मनमानी आदेश, अन्याय, बदनामी, अकारण बदल्या आणि मानसिक छळ होत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु आहे. काही अधिकारी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दखल घेण्याच्या प्रकरणांत विलंब करतात, तर फिर्यादींना अनावश्यक त्रास दिल्याचेही आरोप आहेत. आरोपींना आर्थिक तडजोड करून वाचवले जाते, तर कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे बोलले जाते.
अलीकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मोडतोड प्रकरणात एका मागासवर्गीय पोलिसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडले होते. मात्र त्याचा सन्मान करण्याऐवजी त्यालाच दुजाभाव आणि अपमानास्पद वागणूक दिल्याची चर्चा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर आहे. ही घटना आणि रणदिवे यांची पोस्ट या दोन्ही समोर आल्यानंतर यवत ठाण्यातील अंतर्गत स्थिती किती बिघडलेली आहे याची स्पष्ट झलक मिळते.
यवत परिसरातील नागरिकांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी, वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचे परीक्षण, संपत्ती व आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “देशमुखशाही आता थांबलीच पाहिजे,” असा आवाज नागरिकांमधून उघडपणे उठू लागला आहे.
निखिल रणदिवे यांचा शोध लागेपर्यंत आणि त्यांची प्रकृती व सुरक्षितता स्पष्ट होईपर्यंत संपूर्ण परिसरात भीतीचे सावट कायम आहे. मुलीच्या पहिल्या वाढदिवशी वडिलांनी लिहिलेली “शेवटची शुभेच्छा” ही ओळ केवळ भावनिक नाही; तर पोलीस दलातील जुलूम, अन्याय, मानसिक छळ आणि व्यवस्थेतील गंजलेले अंधारलेले चेहरे यांचा निर्दय पर्दाफाश करणारी आहे.
Editer sunil thorat




