
हडपसर (पुणे) : दि. ६ डिसेंबर २०२५ एस. एम. जोशी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम अत्यंत शांत, संयत आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या आदराने बाबासाहेबांना अभिवादन केले. महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीवर भर देणारे उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. साळुंखे यांनी डॉ. आंबेडकरांच्या बहुआयामी कार्याचा वेध घेत त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांच्या परिश्रमशीलतेने, संघर्षशील जीवनप्रवासाने आणि सामाजिक न्यायासाठीच्या निःस्वार्थ कार्याने भारताला बळकटी दिली. विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन आपली शैक्षणिक वाटचाल अधिक दृढ करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती किरवे यांनी करताना महापरिनिर्वाण दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या वर्तमानकालीन गरजेवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. छाया सकटे यांनी समर्थपणे पार पाडली. त्या दरम्यान उपस्थितांना कार्यक्रमातील प्रत्येक घटकांशी जोडून ठेवत त्यांनी कार्यक्रमाचे वातावरण अधिक अर्थपूर्ण केले. शेवटी डॉ. अजित जाधव यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादित केलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला. महाविद्यालय परिसरात दिवसभर बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देणारे वातावरण निर्माण झाले होते.
Editer sunil thorat



