आईच्या जातीच्या आधारावर मुलीला SC प्रमाणपत्र ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

नवी दिल्ली : सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकणारा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिली आहे. शिक्षणाशी संबंधित तातडीचे प्रश्न लक्षात घेऊन दिलेला हा निर्णय देशभरातील अनेक कुटुंबांसाठी महत्वाचा ठरू शकतो.
पाँडिचेरीतील या प्रकरणात मुलीची आई हिंदू आदि द्रविड प्रवर्गातील असून, तिने आपल्या तीनही मुलांसाठी SC प्रमाणपत्राची मागणी केली होती. विवाहानंतर पती तिच्या माहेरीच राहायला असल्याने संपूर्ण कुटुंब अनुसूचित जातीच्या सामाजिक वातावरणातच वाढलं. मात्र नेहमीप्रमाणे प्रमाणपत्र देताना प्रशासनानं वडिलांची जात आणि पत्ता हा प्राथमिक आधार मानत प्रमाणपत्र नाकारलं.
या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. मद्रास हायकोर्टानं दिलेला आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, “कायद्याच्या मोठ्या प्रश्नावर आम्ही सध्या निर्णय देत नाही; परंतु मुलीच्या शिक्षणाचं नुकसान होऊ देऊ शकत नाही.”
निर्णयादरम्यान सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला—
“बदलत्या काळात आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र का देऊ नये?”
या विधानाला न्यायक्षेत्रात मोठं महत्त्व दिलं जात असून भविष्यात वडिलांची जात वेगळी असली तरी आई SC प्रवर्गातील असल्यास मुलांना SC प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकतो.
देशभरात सध्या “वडिलांच्या जातीवरूनच मुलाची जात ठरते” या परंपरागत नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका प्रलंबित आहेत. त्यावर अंतिम निकाल अद्याप लागलेला नसतानाही सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सामाजिक संकेतांमध्ये बदलाची नांदी मानली जात आहे.
या निकालामुळे आई SC/ ST प्रवर्गातील असून मुलं त्या वातावरणात वाढलेली असतील, तर त्यांच्या हक्कांबाबतचा प्रश्न भविष्यात सुटण्याची शक्यता वाढली आहे. हा निर्णय असंख्य कुटुंबांसाठी दिलासादायक ठरू शकतो.
Editer sunil thorat



