लोणी काळभोर पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धडक ; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; पूर्वगुन्हेगारांवर ‘मोका’ लागू होणार का? प्रश्न कायम ; राजेंद्र पन्हाळे यांच्या कारवाईचे परिसरात कौतुक…

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ८ डिसेंबर २०२५ रोजी गुरुकृपा निवास, माळी मळा, लोणी काळभोर येथे सापळा रचून टाकण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांनी अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त करत ५,४३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संध्याकाळी मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पो.उ.नि. सर्जेराव बोबडे यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धडक देत ११ जणांना रंगेहाथ गाठले. त्यांच्या जवळून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन आणि वापरलेल्या ५ दुचाकी अशा एकूण ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपींत सचिन सकट, विशाल गुप्ता, मंगेश शिंदे, गणेश सानप, योगेश चौधरी, अर्जुन येरवल, अहमद मोगल, विवेक काळभोर, शब्बीर शेख, अल्फाज शेख आणि सयाजी पवार यांचा समावेश आहे. अड्डा चालक कानीफनाथ जगदाळे आणि घरमालक अरुण काळे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा रजि.क्र. ५५५/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पकडलेल्या आरोपींपैकी काहींवर आधीपासूनच गुन्हे नोंद असल्याची चर्चा असून अशा पूर्वगुन्हेगारांवर ‘मोका’ (MCOCA) लागू करण्याबाबतचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून याविषयी अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत अवैध दारूवर १०३, अवैध गांजा विक्रीवर १४, जुगार अड्ड्यांवर ३६, गुटखा साठा-विक्रीवर १ अशा मिळून १५४ मोठ्या कारवाया केल्या आहेत. दोन मटका व्यवसायिकांवर एमपीडीए कारवाई केली असून एक जुगार चालक आणि एक महिला दारू विक्रेत्या यांना तडीपार करण्यात आले आहे.
अवैध धंद्यांविरोधातील सतत आणि ठोस मोहिमेमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कठोर भूमिकेचे स्वागत केले आहे.
यापुढेही अशाच कडक कारवाया सुरूच राहतील, असा निर्धार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी व्यक्त केला आहे.




