उरुळी कांचन तलाठी कार्यालयात कोतवालाची गुंडगिरी? संतप्त नागरिकांचा सवाल ; उर्मट वागणुकीने नागरिक त्रस्त; अरेरावी टोकाला…व्हिडिओ पाहा…

उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन तलाठी व मंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अरेरावी, उर्मट वागणूक आणि सरळसरळ गुंडगिरीमुळे आता नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला असून “शासकीय कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी?” असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास घडलेल्या घटनांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
सातबारा, रेशन कार्ड, दुरुस्ती — पण नागरिकांची फक्त चकरा…
सातबारा फेरफार, चुकीच्या नोंदींच्या दुरुस्त्या आणि रेशन कार्डसाठी येणाऱ्या नागरिकांना सातत्याने एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरवणे, मुद्दाम काम लांबणीवर टाकणे, पोचपावती न देणे आणि “दोन-चार दिवसांनी या” अशी चिरंतन उत्तरे देत पाठवून देण्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. नागरिकांच्या मते, कामासाठी येणारा सामान्य माणूस आणि शेतकरी अनेक महिने फक्त फेऱ्या मारत राहतो, तर कर्मचाऱ्यांचा उर्मट सूर आणि नकारात्मक वागणूक अधिकच अपमानकारक बनली आहे.
ओळखपत्र विचारताच कोतवालाचा संताप— नागरिकांवर धावून जाण्याचा प्रकार…
यापैकी सर्वात धक्कादायक म्हणजे ओळखपत्र विचारल्यावर कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर धावून जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तक्रारदार विजय तलरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास केवळ ओळखपत्र विचारता त्याने “तू कोण ओळखपत्र विचारणारा?” असा उर्मट सवाल करत थेट त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा कर्मचारी म्हणजे कोतवाल रामलिंग भोसले असल्याचे त्यांनी सांगितले. तलरेजा यांनी पुढे सांगितले की, “पंधरा दिवसांपासून फेऱ्या मारतोय. काम होत नाही, आणि वर अरेरावी सहन करावी लागते.”
नऊ महिन्यांच्या चकरा आणि त्यातही अरेरावी— नागरिकांचा संताप उसळला…
उदय बडे यांनीही अगदी तशाच घटना अनुभवल्याचे सांगितले. ते नऊ महिन्यांपासून रेशन कार्डाच्या कामासाठी चकरा मारत असून, कोतवाल रामलिंग भोसले यांनी त्यांच्या अंगावर धावून जाऊन खालच्या शब्दांत बोलल्याचा आरोप त्यांनी केला. “हे कर्मचारी कोतवाल आहेत की गाव गुंड?” असा संतप्त प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला.
पोचपावती नाही, फाईली लपवणे, माहिती दडवणे— विश्वास ढासळतोय…
कर्मचाऱ्यांकडून पोचपावती न देणे, फाईली लपवून ठेवणे, आवश्यक माहिती अस्पष्ट ठेवणे, ओळखपत्र गळ्यात न लावणे आणि नागरिकांशी एकेरी, कठोर भाषेत बोलणे हे प्रकार नियमित झाल्याचे सांगण्यात आले. तलाठी कार्यालयावरील नागरिकांचा विश्वास त्यामुळे ढासळत चालला आहे आणि प्रत्येक नागरिक भीती व असहायतेच्या भावनेने परत जात आहे. “ओळखपत्र गळ्यात लावा” अशा पोस्टरसमोरच कर्मचारी ते न पाळण्याचा प्रकारही नागरीकांनी निदर्शनास आणला.
सोरतापवाडीतील ताजी घटना; महसूल विभागावर प्रश्नचिन्ह…
काही दिवसांपूर्वी सोरतापवाडी तलाठी कार्यालयातही खाजगी इसमाने पत्रकारावर अरेरावी केली होती. त्या घटनेची धूळही बसली नसताना उरुळी कांचनची घटना समोर आल्यानं महसूल विभागाच्या एकंदर कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की अरेरावी, मनमानी आणि गैरव्यवहार आता अपवाद नसून नियमितता बनत चालली आहे.
ट्रू-काॅलरवर भोसले ‘तलाठी’ ; प्रत्यक्षात कोतवाल — दिशाभूल की संरक्षण?
यातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे कोतवाल रामलिंग भोसले यांचा मोबाईल नंबर ट्रु-काॅलरवर ‘तलाठी’ म्हणून दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शासकीय ओळखीत दिशाभूल होतेय का, अशा माहितीचा गैरवापर केला जातोय का, किंवा यामागे स्थानिक संरक्षण वा हितसंबंध आहेत का—याबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
“खरंच कारवाई होणार का?” — नागरिकांची ठाम मागणी…
“या कोतवालावर खरोखर कारवाई होणार का? तक्रारी वाढत आहेत, मग जबाबदार कोण?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन, चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की कारवाई न झाल्यास महसूल विभागावरील उरलेला विश्वासही संपेल.
शासनाची भूमिका कसोटीवर ; पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष…
उरुळी कांचन तलाठी कार्यालयातील वाढती मनमानी, नागरिकांशी होणारी हेळसांड आणि खुलेआम अरेरावी या सर्व पार्श्वभूमीवर शासन नेमकी कोणती भूमिका घेणार—हेच आता नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. महसूल विभागाचे “नागरीकाभिमुख प्रशासन” हे प्रत्यक्षात सिद्ध होणार की कागदावरच राहणार—याची मोठी कसोटी या प्रकरणातून लागणार आहे. दोषींवर ठोस कारवाई होते का की सर्व काही दडपून टाकले जाते—हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Editer sunil thorat





