मुर्तिजापूरमध्ये गुरुचरित्र वाचनसप्ताहाची भक्तिमय पार पडलेली धामधूम, गावोगाव हरिपाठ उपक्रमातून युवा पिढीत अध्यात्मिक जागर संपन्न…

मुर्तिजापूर : दि. ०५ डिसेंबर २०२५ मुर्तिजापूर शहरात यंदाचा सर्व कार्यसिद्धी गुरुचरित्र वाचनसप्ताह भव्य दिमाखात आणि अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. स्व. सदाशिव शास्त्री व स्व. इंदिरा आई कंझरकर यांच्या प्रेरणात्मक आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारा हा सप्ताह यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. स्व. भुषण दीपक कंडारकर (माजी संचालक) यांच्या स्मरणार्थ या वर्षी दत्तसंप्रदायाप्रमाणे दत्तधाम—पिठापूर, कारंजा गुरुमंदीर आणि गाणगापूर—या तीनही प्रमुख दत्तस्थानांची प्रतिकृती साकारण्यात आली. या प्रतिकृतींमुळे माहात्म्यपूर्ण वातावरण अधिक प्रभावीपणे अनुभवता आले.
२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान सप्ताहाचे आयोजन…
मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शुक्रवार दि. २८/११/२०२५ पासून ते शुक्रवार दि. ०५/१२/२०२५ पर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले. संसारातील कलह, अडचणी, मानसिक तणाव, आरोग्य-समस्या तसेच कार्यसिद्धी, संकल्पपूर्ती आणि कुटुंबातील सुख-शांतीसाठी मोठ्या संख्येने दत्तभक्तांनी सप्ताहात हजेरी लावली.
स्थानिक व परिसरातील भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य अनुभवता आले.
कंझरकर महाराजांच्या प्रेरणेने भव्य कार्यक्रम…
या उत्सवाचे संयोजक व वाचासिद्धी म्हणून स्व. डॉ. दीपक सदाशिव कंझरकर महाराज यांच्या मार्गदर्शनाचे विशेष महत्त्व आहे. दत्त संप्रदाय प्रसारक, नामवंत ज्योतिषी, उत्कृष्ट भविष्यकार, थायलंड येथे मिळालेल्या जागतिक ज्योतिष पुरस्काराने सन्मानित तसेच भारतीय ज्ञानपीठ, मुर्तिजापूरचे माजी मुख्याध्यापक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे.
त्यांच्या प्रेरणेने गावोगाव धार्मिक जागरण, अध्यात्मिक संस्कार आणि दत्तभक्तीची परंपरा अधिक जोमाने रुजत असल्याचे मानले जाते.
ग्रंथवाचन सेवा…
यंदा गुरुचरित्र वाचनाचा मान नामवंत ज्योतीविंद, भविष्यकार सौ. अश्विनीताई जोशी (कंझरकर) यांना लाभला. त्यांच्या ओघवत्या शब्दांमुळे आणि सोप्या भाषेत ग्रंथातील तत्त्वज्ञान स्पष्ट केल्याने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले.
गावोगाव ‘हरिपाठ’ सुरू करण्याचा विशेष उपक्रम — युवांची मोठी उपस्थिती… या वर्षीचा आकर्षणाचा मुख्य मुद्दा म्हणजे गावोगाव सुरू केलेला ‘हरिपाठ उपक्रम’. “ज्या गावात नियमित हरिपाठ होतो, त्या गावावर ज्ञानदेवीची कृपा राहते आणि त्या गावाला ज्ञानेश्वरीची भेटच मिळते,” या भक्तीभावातून हा उपक्रम सुरु करण्यात आला. युवा वारकरी मंडळींमध्ये उत्साह निर्माण करून वारीसंप्रदायाची पिढ्यान् पिढ्यांपर्यंत चालणारी परंपरा टिकवून ठेवण्याचा उद्देश यात होता.
किंखेड कामठा (जि. अकोला) येथे झालेला हरिपाठ सादरीकरण विशेष गाजले. शिस्तबद्ध सादरीकरण, सामूहिक टाळ-चिपळ्यांचा नाद, ओवी-नामस्मरण आणि अत्यंत सुंदर सुसंवादामुळे या गावाला वारकरी बांधवांकडून “हरिपाठ गौरव-पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे संपूर्ण परिसरात समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
या सर्व कार्यक्रमांचे नियोजन, व्यवस्थापन आणि संयोजनाची धुरा राजेश जोशी, प्रियांका कंझरकर, किरण (किर्ती) बोंगार्डे, यांनी समर्थपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर समन्वय, भक्तनियोजन, अभ्यागतांचे स्वागत, हरिपाठ उपक्रमासाठी युवा बांधवांना एकत्र आणणे या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत उत्साहाने सांभाळल्या.
भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता…
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाआरती, प्रसाद वितरण, गुरु-पूजन आणि समाधीस्थ स्थळांवर विशेष अभिषेक करण्यात आला. संपूर्ण सप्ताहात शांतता, भक्तिभाव, अध्यात्मिक स्पंदने आणि ‘गुरुकृपा सर्वकार्यसिद्धीचा आधार’ हा संदेश सातत्याने आधोरेखित होत राहिला. भक्तांमध्ये समाधानाची भावना, आनंद, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा नवा संचार दिसून आला.
Editer sunil thorat





