हमालांना स्वाभिमान देणारे डॉ. बाबा आढाव : एक हमालपुत्राची हृदयस्पर्शी आठवण… डॉ. गणेश राख…

पुणे : “हमाली, कष्ट आणि श्रम यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबा आढाव. त्यांनी आम्हा हमालांच्या घरांमध्ये स्वाभिमानाचा प्रकाश आणला,” अशा शब्दांत बेटी बचाव जन आंदोलनाचे प्रणेते डॉ. गणेश राख यांनी कामगार चळवळीतील या महान नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. गणेश राख यांनी आपल्या बालपणापासून सुरू झालेल्या संघर्षमय प्रवासाची, हमालीच्या कष्टाची, आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेची आठवण करून देताना डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दुष्काळाची छाया आणि पुण्याकडे स्थलांतर…
डॉ. राख यांचे मूळ गाव करमाळा (जि. सोलापूर) हा त्या काळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाई. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीवर जगणे कठीण झाले होते. त्यामुळे 1984 साली त्यांच्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाने पुण्याकडे स्थलांतर केले. शिक्षण नसल्याने त्यांना दुसरे काम मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून त्यांनी गुलटेकडी मार्केट यार्डच्या धान्य बाजारात हमालीचे काम सुरू केले. हा पिढीजात व्यवसाय असल्याने नातेवाईकांतील अनेक जण याच कामात होते. राहायला मिळणारी घरेही हमालांच्या वस्त्यांपुरती मर्यादित होती. समाजातील काही लोकांना वाटे की हमालांच्या मुलांमुळे त्यांची मुले बिघडतील, म्हणून कुणी घर देत नसे. परिणामी माळवाडी–हडपसर परिसरातील हमालांच्या वस्तीतच बालपण गेले.
शंभर किलोच्या पोत्यांतील वास्तव…
त्या काळी हमाली म्हणजे जीवावरचा श्रम. पोती तब्बल 100 किलो वजनाची असत. चप्पल न घालता उन्हात पोती वाहावी लागत. गरम डांबरामुळे पाय अक्षरशः भाजत. घाम, धूळ, धान्याचे ढीग आणि भयानक उन्हात हमालांना दिवसाढवळ्या शरीराचे कण कण ताणावे लागत. डॉ. राख शिक्षणात रस नसल्यामुळे, परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून त्यांच्या आईने त्यांना सातवीची परीक्षा झाल्यावर दोन महिने वडिलांसोबत हमालीसाठी पाठवले. तेथील कठोर कष्ट—अनवाणी पाय, 100 किलोचे ओझे, डांबराचे चटके—हे सर्व पाहून ते पुन्हा अभ्यासाकडे वळले.
हमाल पंचायत आणि डॉ. बाबा आढाव यांचे क्रांतिकारक काम…
हमालांसाठी संघटना उभी करण्याचे, त्यांना एकत्र करण्याचे, आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे महान कार्य डॉ. बाबा आढाव यांनी केले. त्यांनी ‘हमाल पंचायत’ स्थापन करून या वर्गाला संघटित केले. त्यांच्या संघर्षामुळे अनेक बदल झाले. पोत्यांचे वजन कमी झाले, हमालीचा दर वाढला, हमालांसाठी रिटायरमेंट फंड लागू झाला, व्यापारी वर्ग व शासन या दोघांशीही संघर्ष शांत, व्यवस्थित आणि परिणामकारक पद्धतीने केला बाबा नेहमी हमालांना सांगत – “तुमचे काम कष्टाचे आहे, पण मुलांनी हेच काम करायला नको. त्यांना शिक्षण द्या, संस्कार द्या, माणूस बनवा.”
दहावीचा सत्कार आणि देवदूतासारखी भेट…
1991 साली डॉ. राख यांनी दहावीमध्ये चांगले गुण मिळवले तेव्हा डॉ. बाबा आढाव स्वतः त्यांच्या झोपडीत सत्कारासाठी आले. वस्तीतील सर्व हमाल विस्मयचकित झाले. कारण रोज काम करताना ज्यांचे नाव कानी पडत असे, ते नेते त्यांच्या घरात आले होते. तो क्षण आजही त्यांच्या मनात कोरला गेला आहे.
बेटी बचाव जन आंदोलन आणि बाबांचा आशीर्वाद…
3 जानेवारी 2012 रोजी बेटी बचाव जन आंदोलनाची सुरुवात झाल्याचे कळताच बाबांनी हमाल पंचायतच्या वतीने राख यांचा सत्कार केला. ते म्हणाले— “हा सत्कार ध्येय नाही… भविष्यात तुला अजून मोठ्या लढाया जिंकायच्या आहेत.” नंतर बराच काळ ते सतत मार्गदर्शन करत राहिले, फोनवर संवाद ठेवत राहिले, आणि अनेकदा मेडिकेअर हॉस्पिटलला भेटही दिली.
आजही हमालांशी अखंड नातं – डॉ. राख यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये आजही बहुसंख्य रुग्ण हमालवर्गातील आहेत. “ते मला आपल्या घरच्यासारखे मानतात. मी त्यांना माझ्या वडिलांचे सहकारी म्हणून पाहतो,” असे ते सांगतात.
डॉ. बाबा आढावांचे अमर कार्य – त्यांनी हमाल वृत्तीमध्ये स्वाभिमान, एकता, संघर्षाची ताकद आणि मानवतावादी विचार रुजवला. त्यांच्या मार्गदर्शनाने आज अनेक कुटुंबांची पिढी बदलली आहे.
“बाबा आपल्यात नाहीत… पण त्यांचे संस्कार जिवंत आहेत” आपल्या आठवणींत डॉ. राख भावूक स्वरात म्हणाले, “डॉ. बाबांनी हजारो हमालांचे आयुष्य घडवले. आम्हाला स्वाभिमान दिला. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांमुळे उभी राहिलेली संस्कारक्षम पिढीच त्यांना खरी श्रद्धांजली.” डॉ. बाबा आढाव या महान कामगार नेत्यास त्यांनी कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Editer sunil thorat



