लोणी काळभोर तहसिलचा ‘नो-नॉनसेन्स’ आदेश ; त्रयस्थांना इशारा, ई-हक्कातून नागरिकांची फसवणूक थांबवा—मोठ्या कारवाईची तयारी!…सविस्तर वाचा…
नागरिकांच्या तक्रारींवर तहसिलचे धारदार पाऊल; ई-हक्कातील तफावत व बेकायदेशीर दलालीवर मोठी मोहीम!

लोणी काळभोर (ता. हवेली) : 10 डिसेंबर 2025 लोणीकाळभोर अपर तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी महसूल प्रशासनातील वाढत्या अनियमितता, त्रयस्थांचे बेकायदेशीर हस्तक्षेप आणि ई-हक्क प्रणालीकडे होत असलेले दुर्लक्ष यावर थेट कारवाईची भूमिका घेत सर्व मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कडक इशारा देणारे सविस्तर ज्ञापन जारी केले आहे.
शासनाच्या परिपत्रकांनुसार शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे खासगी त्रयस्थ इसम ठेवण्यास स्पष्ट मनाई असतानाही, मंडल व ग्राम महसूल कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्ती काम करत असल्याचे, शासन अभिलेख हाताळत असल्याचे आणि नागरिकांशी आर्थिक व्यवहार करत असल्याचे गंभीर तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. काही ठिकाणी या व्यक्तींमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी केल्याचेही दाखले मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपर तहसिलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांची स्पष्टपणे खबरदारी घेत “शासकीय कार्यालयात खासगी व्यक्ती ठेवणे हा गंभीर नियमभंग असून असे आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल” असा कडक इशारा दिला आहे.
यापूर्वीही शासनाने 2013 पासून अनेक परिपत्रके काढून, तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत व तालुका कार्यालयातील मासिक-साप्ताहिक आढावा बैठकीत या बाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही कार्यालयांत अनधिकृत व्यक्ती काम करत असल्याचे दिसून आल्याने, महसूल प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे अपर तहसिलदारांनी नमूद केले आहे.
यानंतर ई-हक्क प्रणालीसंदर्भातही गंभीर विसंगती आढळल्याचे प्रशासनाने नोंदवले. शासनाने नागरिकांना पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी ई-हक्क प्रणाली अनिवार्य केली असून, सर्व अर्ज केवळ ऑनलाइन ई-हक्क पोर्टलमधून स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र तालुक्याच्या MIS तपासणीत ई-हक्क नोंदी आणि प्रत्यक्ष कार्यालयीन नोंदवहीत मोठी तफावत आढळून आली आहे. ही बाब शासन आदेशाचा स्पष्ट अवमान असल्याचे सांगत “ई-हक्क प्रणालीतील नोंदींचा अपप्रयोग अथवा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली जाईल” अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.
यासोबतच नागरिकांना अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक महसूल कार्यालयाने ‘फिरती दौरे’ बोर्ड लावणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कार्यालयांत हे बोर्ड लावले नसल्याचे आढळल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. नागरिकांना अकारण अनेकदा उंबरठे घालणे लागू नये, गैरसोय होऊ नये आणि तक्रारी येऊ नयेत म्हणून सर्व कार्यालयांनी तत्काळ फिरती दौरे बोर्ड लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अपर तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिलेल्या कडक सुचना आणि चेतावणीमुळे लोणी काळभोर तालुक्यातील महसूल विभागात शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या काळात प्रत्यक्ष कारवाई होण्याची शक्यता प्रशासन वर्तवत आहे.
या अनुषंगाने अप्पर तहसीलदार परिक्षेत्रात जर खाजगी कर्मचारी आढळल्यास कठोर कारवाई करत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे परिपत्रक काढून तलाठी, मंडल यांना पाठवण्यात आले आहे.
Editer sunil thorat



