
हडपसर (पुणे) : दि. १३ डिसेंबर २०२५ शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या भारतीय ज्ञानप्रणाली ग्रंथदिंडीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथील विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणे, सर्जनशील लेखन परंपरा जोपासणे तसेच भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या पुस्तक महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, संयोजक राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाअंतर्गत आयोजित ग्रंथदिंडीमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय गणित परंपरा या विषयावर माहितीपूर्ण फ्लेक्स तयार करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली. भारतीय ज्ञानपरंपरेतील गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान व त्यांचे आधुनिक काळातील महत्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्योती किरवे, प्रा. अजित जाधव, डॉ. सोपान आयनार, ग्रंथपाल शोभा कोरडे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल चौरे यांनी केले.
ग्रंथदिंडीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कला, साहित्य व संस्कृती विषयक विविध ग्रंथांची खरेदी करून वाचनाची आवड जोपासली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासोबतच भारतीय ज्ञानपरंपरेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat





