
किर्ती बोंगार्डे
अकोला : युवा विचारपीठ व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला आयडॉल पर्व ४ चा भव्यदिव्य ग्रॅण्ड फिनाले अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध नियोजनात आणि रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ४०० स्पर्धकांनी या महागायन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तीन आठवड्यांच्या चुरशीच्या आणि कसोटीच्या प्रवासानंतर अंतिम फेरीत निवड झालेल्या ३५ गुणी स्पर्धकांनी आपल्या सुमधुर गायनकलेने उपस्थित रसिक, परीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली.
ग्रॅण्ड फिनालेच्या रंगमंचावर गायनाच्या विविध शैली, राग-तालांचे सौंदर्य आणि भावनांचा उत्कट आविष्कार अनुभवायला मिळाला. प्रत्येक स्पर्धकाच्या सादरीकरणातून त्यांची सातत्यपूर्ण साधना, कठोर मेहनत आणि कलात्मक परिपक्वता प्रकर्षाने दिसून आली. शास्त्रीय, सुगम, भावगीत तसेच आधुनिक संगीताच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.
स्पर्धेच्या निकालात अ गटामध्ये कु. श्रीमई चिंचोळकर हिने उत्कृष्ट गायन सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत अकोला आयडॉल पर्व ४ ची मानाची विजेती ठरण्याचा बहुमान मिळवला. द्वितीय क्रमांक कु. शरयू वाघ हिने, तर तृतीय क्रमांक चि. अथर्व नागरगोजे याने मिळवला. याच गटात चैतन्य देशमुख व प्रेम तेलंग यांना प्रोत्साहन बक्षिसाने गौरविण्यात आले. ब गटामध्ये कु. भाग्यश्री खानोदे हिने प्रथम क्रमांक मिळवत परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. द्वितीय क्रमांक कु. तेजस्विनी खोदतकर, तर तृतीय क्रमांक मलंग शहा याने पटकावला. अंकित कैथवास व अनमोल शर्मा यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. क गटात राजन कारंजकर यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला, तर द्वितीय क्रमांक नयना पोहेकार आणि तृतीय क्रमांक वामन जवंजाळ यांनी मिळवला. पल्लवी कावडे व मुकुल तिवारी यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा यथोचित गौरवही करण्यात आला. युवा विचारपीठ आयोजित उद्योगरत्न स्व. कालुरामजी रुहाटिया अकोला आयडॉल संगीत गौरव पुरस्कार प्रा. डॉ. किशोर देशमुख यांना प्रदान करण्यात आला. तसेच गाणचक्षू स्व. रामकृष्णजी कोल्हाळे स्मृती अकोला आयडॉल संगीत साधक पुरस्कार प्रा. डॉ. नीरज लांडे यांना देऊन त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान संगीत साधनेचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला संगीत, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मुख्य प्रायोजक संजयजी रुहाटिया (संचालक, विठ्ठल ऑइल), प्राचार्य डॉ. रामेश्वरजी भिसे, समाजसेवक प्रा. डॉ. संतोष हुशे, निलेशबाप्पु देशमुख, डॉ. प्रवीण अग्रवाल, मंगेश कराळे, मनोज भालेराव, डॉ. हर्षवर्धन मानकर, डॉ. संजय तिडके, हास्यकवी किशोर बळी, निमंत्रित गायक प्रसाद उलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या संपूर्ण महागायन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे युवा विचारपीठाचे अध्यक्ष व मुख्य आयोजक प्रा. निलेश ढाकरे, उपाध्यक्ष व संयोजिका स्मिता अग्रवाल, मुख्य समन्वयक राजेश अग्रवाल, कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक यांच्यासह गिरीधर भोंडे, डॉ. नितीन देशमुख, ऍड. शेषराव गव्हाळे, प्रा. गणेश पोटे, प्रा. कोमल चिमणकर, अश्विनी ढोरे, डॉ. तृप्ती भाटिया, मेघा देशपांडे, काजल वासरानी, पल्लवी पाठक, रीमा ढाकरे, सपना गव्हाळे, कु. सुरभी दोडके आदींचे अथक परिश्रम, काटेकोर नियोजन आणि संघभावना कारणीभूत ठरली.
अकोला आयडॉल पर्व ४ हा केवळ गायन स्पर्धा न राहता नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देणारा, संगीत साधनेचा सन्मान करणारा आणि मराठी सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय महोत्सव ठरला.
Editer sunil thorat




