
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. युती-आघाडीच्या चर्चांना उधाण आले असतानाच शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून निलेश काळभोर यांच्याकडे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकीसह पुणे जिल्ह्यातील शिरूर–हवेली मतदारसंघातील तब्बल ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणांची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सन्मानपूर्वक वागणूक व योग्य वाटाघाटी झाल्या नाहीत, तर शिंदे गट स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका स्थानिक पातळीवर मांडली जात आहे. यामुळे विद्यमान राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक जाहीर होऊनही अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाची अधिकृत बैठक, पदाधिकारी परिषद किंवा कार्यकर्ता मेळावा झालेला नाही. मात्र, याउलट पडद्यामागे राजकीय हालचाली वेगात सुरू असून इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली आहे.
सध्या या परिसरातील राजकीय चित्र पूर्णतः अस्पष्ट आहे. कोण कोणासोबत युती करणार, कोण स्वतंत्र लढणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. याच अनिश्चिततेमुळे अनेक इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.
दरम्यान, काही इच्छुक उमेदवारांनी थेट शिवसेना शिंदे गटाशी संपर्क साधल्याचे समजते, तर काहीजण शेवटच्या क्षणी कोणत्या पक्षाची साथ मिळते किंवा ताकदवर उमेदवार आपल्या गटात येतो का, याची वाट पाहत आहेत. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडूनच होणार असल्याने सध्या चर्चांपुरतेच राजकारण मर्यादित आहे.
महत्त्वाचे म्हणजे, शिवसेना शिंदे गट यावेळी विकासकेंद्री मुद्द्यांवर भर देणार असून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन उमेदवार निवडले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकूणच, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी परिसरात निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असली तरी युती, गणिते, उमेदवारी आणि पक्षीय ताकद याभोवतीच सध्या सगळी चर्चा फिरत असून राजकीय चित्र अजूनही धूसरच आहे.
Editer sunil thorat



