
कुंजीरवाडी (ता. हवेली) : आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी होत चाललेल्या समाजात प्रामाणिकपणाचा आदर्श जपणारी घटना कुंजीरवाडी येथे घडली असून, एका शाळकरी मुलीने रस्त्यात सापडलेले साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे मालकाच्या ताब्यात देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
कुंजीरवाडी येथील प्रभावती धुमाळ या सकाळी नेहमीप्रमाणे पायी चालण्यासाठी बाहेर पडल्या असता त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र नकळत गळ्यातून निसटून रस्त्यावर पडले. घरी परतल्यानंतर ही बाब त्यांच्या व कुटुंबीयांच्या लक्षात येताच सर्वांनी मंगळसूत्राचा शोध सुरू केला.
याच दरम्यान प्रभावती धुमाळ यांचा मुलगा रस्त्यावर शोध घेत असताना त्यांना शाळेत जाणाऱ्या काही मुली भेटल्या. त्यामधील कु. रुद्रा धुमाळ हिने रस्त्यावर सोन्याचे मंगळसूत्र सापडल्याचे सांगून ते प्रामाणिकपणे परत केले. विशेष म्हणजे तिला देऊ केलेल्या खाऊच्या पैशांचा स्वीकार करण्यासही तिने नम्रपणे नकार दिला.
शाळेत झाला सत्कार…
कु. रुद्रा धुमाळ हिच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत धुमाळ कुटुंबीय व स्व. विलास बापु तुपे फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाशी संपर्क साधून शाळेत छोटेखानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कु. रुद्रा हिचा सन्मान करण्यात आला. तसेच तिचे वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कु. रुद्रा हिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत तिच्या घरातील संस्कारक्षम वातावरण आणि शाळेतील नैतिक शिक्षणाचे विशेष कौतुक केले.
‘प्रामाणिकपणाचे झाड’ ठरले आकर्षण…
सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, पर्यावरण संरक्षण समिती कुंजीरवाडी व स्व. विलास बापु तुपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कु. रुद्रा हिच्या प्रामाणिकपणाचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसमोर कायम राहावा आणि प्रामाणिकपणाची प्रेरणा शाळकरी मुलांना मिळावी या उद्देशाने शाळेच्या प्रांगणात १५ फूट उंचीची गावठी सोनचाफ्याची दोन झाडे लावण्यात आली. या झाडांचे नामकरण “प्रामाणिकपणाचे झाड” असे करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मनापासून कौतुक केले. कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाला प्रभावती धुमाळ यांचे कुटुंबीय, कु. रुद्रा धुमाळ हिचे कुटुंबीय, युवा नेते नयन तुपे, शाळेचे सचिव गोरख घुले, कुंजीरवाडी गावचे सरपंच हरेश गोठे, मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत, कार्यालयीन अधीक्षक सुखदेव कंद, तसेच शिक्षकवृंद, पर्यावरण संरक्षण समिती व स्व. विलास बापु तुपे फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat




