लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात तिकिटयुद्ध पेटले ; इच्छुकांची चढाओढ, अनिच्छितांमध्ये अस्वस्थता…
लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात तिकिटयुद्ध ; घमासान सुरू!

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जबरदस्त वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शीतल कांबळे, अनिता गवळी आणि पूनम गायकवाड यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
तिकिट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवण्यात आला असून स्थानिक कार्यकर्त्यांची मोट बांधण्यावर भर दिला जात आहे. घराघरात पोहोचण्यासाठी स्वतंत्र प्रचारयोजना आखल्या जात असून, अंतर्गत बैठका, भेटीगाठी आणि जनसंपर्क मोहिमा वेगाने सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून कोणाच्या गळ्यात उमेदवारी पडणार, याबाबत कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजप आणि शिवसेना या प्रमुख पक्षांकडूनही अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि वडकी परिसरातील मतदारांचे लक्ष तिन्ही पक्षांच्या निर्णयांकडे लागले आहे. पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा असली तरी अधिकृत भूमिका स्पष्ट न झाल्याने राजकीय समीकरणे सतत बदलत असल्याचे चित्र आहे. या गटातून पूनम गायकवाड या देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पंचायत समिती गणांच्या बाबतीतही परिस्थिती तितकीच चुरशीची आहे. लोणी काळभोर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेश्मा युवराज काळभोर यांना तिकीट मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावावर पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर एकमत होत असल्याची चर्चा असून कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, मजबूत जनसंपर्क आणि संघटन कौशल्य ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
मात्र, कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल टेकाळे, भरत मिसाळ, अक्षय म्हस्के, विजय दाभाडे, प्रकाश भिसे आणि राहुल जोगदंड हे सहा इच्छुक उमेदवार मैदानात असून पक्ष नेतृत्वासमोर एकाच उमेदवाराची निवड करताना मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका उमेदवाराची निवड झाल्यास उर्वरित इच्छुकांची नाराजी कशी शमवायची, हेही पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
भाजपकडून नुकुल शिंदे, राकेश लोंढे, भगवान साळवे आणि ज्ञानेश्वर नामुगाडे हे इच्छुक उमेदवार असल्याने या गणात बहुपक्षीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून शीतल कांबळे, अनिता गवळी, पूनम गायकवाड आणि सिंपल कांबळे या चार नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून प्रचाराची तयारी सुरू केली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपापल्या पातळीवर रणनीती आखण्यात येत आहे. अनिता गवळी या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून विविध विकासकामांमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शीतल कांबळे यांनी स्थानिक पातळीवर भक्कम जनसंपर्क तयार केला असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम सुरू ठेवले आहे. पूनम गायकवाड आणि सिंपल कांबळे यांनीही प्रचाराचा धुमधडाका सुरू केल्याने गटातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
तिकिटासाठी वाढलेल्या या तीव्र स्पर्धेमुळे अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून, तिकीट न मिळाल्यास काही नाराज उमेदवार बंडखोरी करून अपक्ष म्हणून मैदानात उतरतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास मतांचे विभाजन होऊन अधिकृत उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजांची मनधरणी कशी केली जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्थानिक विकास हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी असणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत घोषणा होताच प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असून लोणी काळभोर गटातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.
Editer sunil thorat



