लोणी काळभोर–वडकी पंचायत समिती गणात शिंदे गट शिवसेनेची ठाम आघाडी…
नंदिनी हेमंतकुमार कोळपे यांची उमेदवारी जाहीर; निलेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली AB फार्मवर रणनीती...

कदमवाकवस्ती (ता हवेली) : लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी पंचायत समिती गण क्रमांक ८२ मध्ये निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र झाली असून, शिवसेना शिंदे गटाने उमेदवार जाहीर करत आणि संघटनात्मक यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यान्वित करत ठाम आघाडी घेतली आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे नंदिनी हेमंतकुमार कोळपे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना सचिव राम रेपाळे व माजी राज्यमंत्री व पुरंदर हवेली चे विद्यमान आमदार विजय बाप्पु शिवतारे यांच्या मार्गदरनाखाली या निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेची ताकद अधिक ठळकपणे दिसून येत असून, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकीसह पुणे जिल्ह्यातील शिरूर–हवेली मतदारसंघातील तब्बल ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणांची संघटनात्मक जबाबदारी निलेश काळभोर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ते जिल्हास्तरापर्यंत पक्षाचे नियोजनबद्ध जाळे सक्रिय झाले आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निलेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘AB फार्म’ हे प्रचार, बैठका आणि रणनीतीचे मुख्य केंद्र (वॉर रूम) म्हणून निश्चित करण्यात आले आहे. येथे बूथनिहाय आढावा, कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रचाराची दिशा व आगामी कार्यक्रमांचे नियोजन सातत्याने केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला अधिक शिस्तबद्ध आणि आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे.
नंदिनी कोळपे या माजी पंचायत समिती सदस्य मल्हारी (तात्या) कोळपे यांच्या सुनबाई असून, कोळपे कुटुंबाचा या परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. मल्हारी तात्या कोळपे यांनी पंचायत समितीमार्फत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात अनेक ठोस विकासकामे मार्गी लावली आहेत. त्याच विश्वासाच्या बळावर नंदिनी कोळपे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
सुशिक्षित, सामाजिक कार्याची आवड असलेली उमेदवार म्हणून नंदिनी कोळपे यांची ओळख असून, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी, तसेच मूलभूत सुविधा सक्षम करणे हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.
उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय रणनीती आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे प्रचाराला वेग आला आहे. निलेश काळभोर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हालचालींमुळे या गणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने त्या पक्षांतील इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एकूणच, उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, संघटनात्मक नियंत्रण आणि AB फार्मवरून चालणारी नियोजनबद्ध रणनीती यामुळे लोणी काळभोर–वडकी पंचायत समिती गणात शिंदे गट शिवसेना आक्रमक भूमिकेत उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Editer sunil thorat




