‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात; व्हाइस अॅडमिरल पवार यांचे युवकांना आवाहन…

पुणे (हवेली) : “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या उपस्थितीत, मॅनेट कॅडेट्सच्या शिस्तबद्ध कवायती आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भारलेल्या वातावरणात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘मॅनेट’ प्रांगणात भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती…
समारंभाचे प्रमुख पाहुणे नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल मुरलीधर एस. पवार होते. व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांनी स्वतःला सुदृढ ठेवा : व्हाइस अॅडमिरल पवार
व्हाइस अॅडमिरल पवार म्हणाले, “भारतीय नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. जशी जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा दिली, तशीच आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्रथम पालकांची आणि नंतर शिक्षकांची आहे. भारताला महासत्ता बनविण्यात युवकांची भूमिका निर्णायक असेल. त्यासाठी त्यांनी स्वतःला सुदृढ ठेवावे, तसेच अमली पदार्थांपासून दूर राहावे.”
युवकांनी कौशल्याधिष्ठीत होण्याची गरज ; डॉ. मंगेश कराड
डॉ. कराड म्हणाले, “भारताचे स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही, अनेकांच्या बलिदानानंतर आज आपण येथे आहोत. स्वातंत्र्यसैनिकांसह शेतकरी आणि कामगार यांचाही देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कौशल्याधिष्ठीत आणि समस्यांचे निराकरण करू शकणारी युवकांची पिढी घडविणे आवश्यक आहे.”
देशभक्तीच्या वातावरणातील सांस्कृतिक सादरीकरणे…
ध्वजारोहण सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारून टाकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मॅनेट कॅडेट्सनी केले.
Editer sunil thorat







