
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : जलजीवन मिशनअंतर्गत गावाच्या पाणीपुरवठा योजनेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला आहे. ग्रामपंचायत कदमवाकवस्तीने कवडीमाळवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी ४ गुंठे जागा अधिकृतरीत्या खरेदी करून योजनाला निर्णायक गती दिली.
दोन वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीकडून नायर कुटुंबियांसोबत या जागेचा व्यवहार करण्यात आला होता. सध्या परिसरातील जमिनींचे भाव प्रति गुंठा ३० लाखांपेक्षा अधिक असतानाही, दिलेला शब्द पाळत नायर कुटुंबियांनी गावाच्या पाणी योजनेसाठी जागा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल आज नवपरिवर्तन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
योजनेसाठी लोकवर्गणीच्या स्वरूपात देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. पाण्याची टाकी उभारल्यानंतर गावातील प्रत्येक घराला शुद्ध, पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी ही जागा महत्त्वाची ठरणार आहे.
ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गावातील दीर्घकालीन पाणीटंचाईला मोठा दिलासा मिळणार आहे.
Editer sunil thorat





