
लोणी काळभोर (पुणे) : कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व हवेली तालुक्यातील रामदारा रस्त्यावरच्या नवीन कॅनॉलवरील पुलाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुलाखालील पाण्याचा प्रचंड जोर आणि झालेल्या तडे यामुळे हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित ठरल्याने आजपासून सर्व प्रकारच्या चारचाकी व जडवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त दुचाकी वाहनांची मर्यादित वाहतूक सुरु राहणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज सकाळी प्रशांत काळभोर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, उपसरपंच गणेश तात्याराम कांबळे, बाळासाहेब काळभोर (मा.ग्रा.प. सदस्य), नेता केसकर, गोरख मोरे तसेच पोलीस अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी काळभोर ग्रामस्थांना सूचना देताना सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी सांगितले की, “सध्या पुलावरून जड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करून सहकार्य करावे.”
दरम्यान, पाटबंधारे विभाग व स्थानिक प्रशासनाकडून पुलाची तपासणी करून तातडीच्या दुरुस्तीबाबत पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गावकऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Editer sunil thorat





