२३४ ग्रॅम वजनाचा सुमारे ६ हजार २०० रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त …

पुणे (हवेली) : खुलेआमपणे गांजाची विक्री करणा-या एकास गुरुवार (४ मार्च) रोजी (कदमवाकवस्ती, ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जयहिंद नगर झोपडपट्टीतुन रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आस्लम अन्वर शेख (वय २५ , रा. जयहिंद नगर झोपडपट्टी, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, ता.हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून २३४ ग्रॅम वजनाचा सुमारे ६ हजार २०० रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डीले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल कर्डीले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ मार्च रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. तेव्हा पोलिसांना जयहिंद नगर झोपडपट्टी परिसरात एक इसम गांजा विक्री करीत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आस्लम शेख याला गांजा विकताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.



