
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच तीव्र झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या गटात ताकदीची मांडणी करत आपली स्पष्ट रणनीती जाहीर केली आहे.
लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शीतल कांबळे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शीतल कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या प्रसिद्ध वकील व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले ॲड. सुजीत कांबळे यांच्या सौभाग्यवती आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग, महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने घेतलेली ठाम भूमिका आणि दांडगा जनसंपर्क यामुळे त्या या मतदारसंघात प्रभावी उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महिला मतदारांसह पक्षाच्या पारंपरिक समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समिती गणांसाठीही उमेदवार जाहीर करत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी रेश्मा काळभोर यांना उमेदवारी देण्यात आली असून, कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. या उमेदवारीमुळे सक्षम व विचारपूर्वक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवून निवडणूक ही जिंकण्याच्या इराद्याने दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
रेश्मा काळभोर व अमोल टेकाळे या दोन्ही उमेदवारांची स्थानिक पातळीवरील चांगली ओळख, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि पक्षाशी असलेली निष्ठा ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी जमेची बाजू मानली जात आहे.
पक्ष संघटना मजबूत ठेवत बूथनिहाय नियोजन, स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार आणि पारंपरिक मतपेढी सांभाळत नव्या मतदारांना आकर्षित करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेष भर दिला जात आहे.
एकूणच लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी गटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच इतर पक्षांमध्ये चुरशीची व लक्षवेधी लढत पाहायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
Editer sunil thorat




