पुणे (हडपसर) : महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२४ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

महाविद्यालयाच्या संपूर्ण ग्रंथालयाची स्वच्छता केली व ग्रंथ प्रदर्शनासाठी लागणारे ग्रंथ व्यवस्थितपणे लावून घेतले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. लतेश निकम, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, सहायक ग्रंथपाल श्री. पवन कर्डक, आणि डॉ. बाळासाहेब टिळेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी महाविद्यालयाने घेतलेला हा पुढाकार सर्व स्तरांतून प्रशंसनीय ठरतो आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे वाचनसंवर्धनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. घोरपडे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध ग्रंथांची पाहणी केली.
या प्रदर्शनात शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि तत्त्वचिंतनपर ग्रंथांचा समावेश करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी सेपीअन्स, द इंडियन, कबीर कबीर, बेगम पुराच्या शोधात, आता आमच्या धडावर आमचेच डोके, सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध, आणि ना गुलाम आ उद्दाम यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे परीक्षण केले.

तसेच आंतरराष्ट्रीय साहित्यामध्ये काफ्का ऑन द शोर, नॉर्वेजियन वुड, आफ्टर डार्क आणि द एलिफंट फनी वेनिशेस यांसारख्या ग्रंथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या प्रदर्शनात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२४ या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा