
पुणे (हवेली) : आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, कला, क्रीडा, उद्योग-व्यवसाय, उद्योजकता आदी सर्व ठिकाणी त्या आपले कर्तृत्व सिद्ध करत पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. समान आणि समृद्ध समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिशेने काम केले पाहिजे. असे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ. स्नेहा बुरगुल यांनी केले.
विश्वरत्न फौंडेशन व कन्या प्रशाला लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी विश्वरत्न फौंडेशनचे वतीने कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, माजी सरपंच वंदना काळभोर, शिवसेना उबाठा जिल्हा संघटक श्रद्धा कदम, डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्षिका सुरेखा गव्हाणे, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या शिक्षिका कल्पना बोरकर, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद शासकीय सदस्या अनिता गवळी, दिव्यांग महामंडळ निरिक्षक सविता मोरे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस पाटील प्रियांका भिसे, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा शेवाळे व एसजीके महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्नेहा बुरगुल यांना स्मृतीचिन्ह व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विश्वरत्न फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ननवरे, विश्वस्त भरत सारडा, अँड. श्रीकांत भिसे, तुळशीराम घुसाळकर, कालीदास काळभोर, कुमार गायकवाड, संजय लोंढे, दिलीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापिका डॉ. स्नेहा बुरगुल पुढे म्हणाल्या की अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे. आज आपण कल्पना चावला, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्वान महिलांना आदराने स्मरण करूया. त्यांनी आपल्या कार्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला म्हणजे केवळ शक्ती नाही, तर ती करुणा आणि प्रेमाचा झरा आहे. आजच्या काळात महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढा देणे गरजेचे आहे
त्या शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, नेते आणि उद्योजकही आहेत. त्यांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्याशिवाय समाज अपूर्ण आहे. महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे.
जर आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाविषयी बोललो, तर महिलांना त्यांच्या हक्कांसाठी आधी स्वत:शीच लढावे लागेल, जेणेकरून त्या जगाशी लढताना बळकट होऊ शकतील. पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आत्मविश्वास वाढवून आत्मसन्मान मिळवणे. महिलांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊन स्वत:ची काळजी घेऊन त्यांचा सन्मान वाढवला पाहिजे. आत्म-सन्मान विकसित करताना, आपल्या आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवणे महत्वाचे आहे. जेव्हा महिलांना सशक्त आणि सन्माननीय वाटेल, तेव्हाच त्या समाजात त्यांची ओळख योग्य पद्धतीने प्रस्थापित करू शकतील. असे त्या शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियांका पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्षांराणी पाटील यांनी मानले.



