पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित, गोळीबार प्रकरण मुख्य आरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याचा ठपका ; थेऊर गोळीबार प्रकरण आले अंगाशी…
शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत...

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीतील थेऊर गोळीबार प्रकरणात मुख्यआरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांचे अखेर निलंबन झाले.
महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेले सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती उघडीस आली आहे. तपासात पोलिसाने गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे तपासात पुढे आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात थेऊर येथील दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी थेऊर येथील घडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. हा गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी हजर नव्हता, असे साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने व प्रतिक रमेश बिटे यांचे तपास टिपणांमध्ये नमुद करुन ती तपास टिपणे गुन्हयाचे कागदपत्रांत समाविष्ठ केली आहेत. परंतु लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान भरत जैद हा घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हजर असलेचे सबळ पुरावे प्राप्त झाले आहेत.
घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सी.सी.टी.व्ही. फुटेज गुन्हात जप्त करून भरत जैद बारामतीवरून पुण्याचे दिशेने येताना त्याचे इतर ७ साथीदार यांचेसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये आला नसुन, तो सुदर्शन आगळमे यांचेसोबत त्यांचेकडील शेवोरलेट गाडीमध्ये बसुन आला होता. त्यानंतर तो थेऊर मार्गे न जाता हडपसर, विश्रांतवाडी मार्गे गेला होता, असे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाचे फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसून सुपा पोलीस ठाणे येथून त्याचे इतर ७ साथीदार यांचेसह निघाला होता.
मोशी येथे थेऊर, केसनंद मार्गेच गेला असल्याचे सबळ पुराने प्राप्त झाले आहेत. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस आप्रत्यक्षरित्या सहकार्य करण्याचे दृष्टीने मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही आणि त्यांनी दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या आदेशाने पोलीस दलात खळबळ माजली असुन पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या आदेशाने कर्तव्यात कसूर करणार्यास अभय दिले जाणार नाहीत असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या कारवाई नंतर पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांचे आणखीन कोणासोबत हितसंबंध, कागदपत्रे हेराफेरी, आर्थिक व्यवहार, झाले की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे




