
संपादक सुनिल थोरात.
पुणे (हडपसर) : “राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर सामान्य जनतेच्या हक्कांसाठी मैदानात उतरलेली झुंज असते.” याच विचारांची प्रचिती दिली सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या स्मिता तुषार गायकवाड यांनी. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे.
वेताळ बाबा वसाहतीत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पाण्याच्या टंचाईच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यात आला आहे. स्मिता गायकवाड यांनी सतत पाठपुरावा करून, लोकांचे आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोचवत ठेवल्यामुळेच हे शक्य झाले.
चार वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या पाईपलाईनच्या कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना, स्मिता गायकवाड यांनी पाणीपुरवठा विभाग तसेच लष्कर पाणी विभागाशी सातत्याने संवाद साधत हा विषय कायम चर्चेत ठेवला. कार्यकारी अभियंता राजेश शिंदे व मोराळे यांच्या माध्यमातून अखेर हे काम मार्गी लागले.
बजेटची तरतूद त्वरित करण्यात येणार असून, टेंडर प्रक्रियापण त्वरित सुरू करण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असून साधारण ६ महिन्यांत पाण्याची नवी लाईन पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
यावेळी पांढरे मळा परिसरातील जलवाहिनीचे कामही हाती घेण्यात आले आहे. तेथे सध्या असलेली ४” लाईन ६” करण्यात येणार आहे. यासाठीही ६ महिन्यांचा कालावधी लागेल, आणि तोपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरता पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील.
या निर्णयावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमल वागलगावे, ज्योती पोल, ललित खरात, प्रभावती भूमकर, फरीदा भोरी आदींनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला.
स्मिता गायकवाड पुढे म्हणाल्या, “ही केवळ विकासाची कामे नाहीत, तर ही माणसाच्या जगण्याच्या मूलभूत गरजांची लढाई आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी जबाबदारी होती की या लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा. हा लढा माझा एकट्याचा नव्हता, तो तुमचा, आपला सगळ्यांचा होता!” हा विजय संवेदनशील, बांधिलकीची जाणीव असलेल्या राजकारणाचा आहे. तो जनतेच्या विश्वासाचा आणि संघर्षाच्या ठाम निर्धाराचा असल्याचे सांगितले.




