कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडून राजधानी बेकरीला तात्काळ बंद करण्याची नोटीस… तरीही बेकरी चालू…
केकमध्ये आळ्या आढळल्याच्या घटनेनंतर कारवाई ; कदमवाकवस्ती ग्रामपंचायतची परवानगी, कागदपत्रे सादर करण्याचा आदेश...

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतची वॉर्ड क्र. १ मधील राजधानी बेकरी या व्यावसायिक आस्थापनाला ग्रामपंचायत कदमवाकवस्तीने तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
“केकमध्ये आळ्या आढळल्या” या धक्कादायक वायरल व्हिडिओ आणि बातमीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत उपसरपंच डी. नासीरखान पठाण यांच्या सहीने काढलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेली आरोग्य विभागाची आणि अन्न सुरक्षा विभागाची परवानगी, ग्रामपंचायतीकडून मिळालेला ना हरकत दाखला, तसेच बेकरीच्या जागा मालकाशी झालेला करारनामा त्वरित ग्रामपंचायतीस सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोटीसनुसार, परवानगीशिवाय व्यवसाय सुरू ठेवणे ग्रामपंचायत नियमांचे उल्लंघन असून, बेकरीने तात्काळ आपले कामकाज थांबवावे. अन्यथा ग्रामपंचायतीमार्फत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमुळे करण्यात आल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले.
“अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे पालन हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्यास त्यावर कठोर कारवाई होईल,” असे ग्रामपंचायत अधिकारी अमोल महादेव घोळवे यांनी नमूद केले.
त्याच बरोबर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इतर बेकरी व्यवसाय धारकांकडून जनहितार्थ माहिती मागवण्यात येणार आहे का ? कदमवाकवस्ती परिसरातील अन्न प्रशासन नियमबाह्य व्यवसाय धारकांच्या व्यवसायाची तपासणी करणार का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व अन्न प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त होत आहे.
Editer Sunil thorat




