लोकमान्यांच्या विचारांची नवी पिढीला ओळख! समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात टिळक जयंती उत्साहात साजरी…

पुणे (हवेली) : येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचे आयोजन केले होते. सदर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जेमतेम ६४ वर्षाचे आयुष्य लाभले. या अल्प कालावधीत त्यांनी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना “गीतारहस्य” हा ग्रंथ लिहिला. त्याबरोबरच केसरी, मराठा यासारखे वर्तमानपत्रे चालवली. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. स्वदेशीचा नारा त्यांनी सर्वप्रथम दिला. इंग्रजांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध त्यांनी वर्तमानपत्रातून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय”? अशी टीका केली. राजकीय स्वातंत्र्यांबरोबरच त्यांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव यासारख्या सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनालाही अत्यंत प्राधान्य दिले. त्यांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीमुळेच आज भारत नवनव्या क्षेत्रात क्रांती करत आहे. त्यांचे हे योगदान पुढील कोणत्याही पिढीला विसरता येणार नाही.

कार्यक्रमाचे आभार डॉ. संभाजी निकम यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
Editer sunil thorat




