पुणे : वाढत्या वीजबिलांनी मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यानेही जेरीस आणले आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीतच तब्बल एक लाख ७ हजार ८८ वेळा वीज गुल झाली.
महावितरणने जाहीर केलेल्या ‘रिलायबिलिटी इंडेक्स’मधून ही संतापजनक आकडेवारी पुढे आली आहे.
वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार महावितरणला प्रत्येक महिन्यातील ही आकडेवारी ऑनलाइन जाहीर करावी लागते. यात कोणत्या परिमंडळात किती फिडरवर किती वेळा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे किती तास वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती दिली जाते. परंतु, हा रिलायबिलिटी इंडेक्स किंवा विश्वासार्हता निर्देशांक जाहीर करण्याबाबत अनेकदा महावितरणच्या यंत्रणेकडून काणाडोळा केला जातो.
त्यामुळे पुण्यातील सजग नागरिक मंचाने थेट वीज नियामक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर महावितरणने ३ जानेवारी रोजी तीन महिन्यांचे इंडेक्स जाहीर केले. त्यात ऑक्टोबर या एकाच महिन्यात ६ हजार ३१७ फिडरवर एक लाखापेक्षा अधिक वेळा तांत्रिक बिघाड झाला.त्यामुळे राज्यातील ग्राहकांना तब्बल ५३६ कोटी ५५ लाख ९२ हजार ४५४ मिनिटे म्हणजेच ६७ हजार ८१५ तास विजेविना घालवावे लागले.
खेड्यापाड्यांना यापेक्षाही अधिक त्रास..
रिलायबिलिटी इंडेक्सनुसार महिनाभरात एक लाख वेळा तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. मात्र ग्रामीण भागात यासोबतच भारनियमनाचाही त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय देखभाल दुरुस्तीच्या नावानेही काही वेळा वीज पुरवठा बंद ठेवला जातो.
कोणत्या परिसरात किती वेळा तांत्रिक बिघाड ! झोन बिघाडांची संख्या सविस्तर पहा…
अकोला ५४५७
अमरावती १३,३७९
चंद्रपूर १८६६
गोंदिया ९७८
नागपूर ८१९
बारामती १५,९१३
भांडूप (उ) १०,९००
छत्रपती संभाजीनगर २१०७
जळगाव ४२३१
कल्याण १०,६६४
रत्नागिरी ५५५५
कोल्हापूर १३,०५४
लातूर २०७
नांदेड १७९१
नाशिक ३९९९
पुणे १६,१६८
एकूण १,०७,०८८
महावितरणच्या इंडेक्सवर वीज नियामक आयोगाने नजर ठेवावी. एका महिन्यात इतका तांत्रिक बिघाड होत असेल तर आयोगाने महावितरणला स्पष्टीकरण का मागू नये? जबाबदारी का निश्चित करू नये?
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा